Saturday, 1 November 2014

बंडखोरी

 
anti-मुसलमान ज्वलंत पुस्तकं नेहमीच पचनी पडतात असं नाही. पण कधी कधी काही गोष्टी कबूल कराव्याच लागतात. "मोपल्यांचे बंड" वाचलं तेव्हा त्यातल्या वास्तवाने मला हलवून टाकलं. 'लज्जा', 'रक्त लांच्छन', 'ईश्वर मृतात्म्यास शांती देवो', अशी पुस्तक वाचताना किंवा 'पिंजर' सारखा चित्रपट पाहताना अंगावर काटा येतो आणि डोळ्यात पाणी. पण "मोपल्यांचे बंड" अजून वेगळं वाटलं. त्यातल्या सावरकरी भाषेचा परिणाम असावा कदाचित; पण करुणा वाटण्याऐवजी चीड आली. हिंदू षंढपणाची. आणि कौतुक वाटलं मुस्लिम समाजाच्या एकीचं.


पुस्तक लिहिलंय ते "मला काय त्याचे" ही प्रवृत्ती, हा दृष्टीकोन बदलून टाकण्यासाठी आणि मला वाटतंय की ते होईल सुद्धा. मित्रमंडळातही मुसलमान असतील तर असू द्यावेत पण जोवर ते इतरांच्या धर्माबद्दल सहिष्णू आहेत तोवरच. आजूबाजूला चाललेल्या घटनांना सामान्य समजून मागे टाकताना आणि दुर्लक्ष करताना त्यांचं स्वरूप भीषण कसा होत जातं याचा प्रत्यय हिंदू धर्माने अनेकदा घेतलेला आहे. "मोपल्यांचे बंड" असाच एक घटनाक्रम फक्त वाचून दाखवतं, पण काहीही न गाळता, न टाळता.

हिंदूंनी कधी मुसलमानांना किंवा क्रीश्चनांना हिंदू धर्मात परावर्तीत करून घेण्याचा प्रयत्न केलेला आढळत नाही. मुसलमान हिंदू झाल्याच एकच उदाहरण माझ्याही समोर आहे; ते आहे महम्मद कुलीखान जेव्हा "परत" नेताजी पालकर झाले ते. पण तेसुद्धा मुळातल्या हिंदूलाच परत हिंदू करण्यासाठी केलेलं.
हिंदू राजे आणि नेते याबाबत भलतेच उदार. पण या औदार्याचा इतर धर्मांनी नेहमीच गैरअर्थ घेतलेला दिसतो. हिंदू जबरदस्ती करत नाहीत म्हणजे कोणीही येउन आम्हाला टपली मारून जावं असं नाही. पण इतर धर्म हे सोयीस्कर प्रकारे विसरलेले दिसतात. ताज महालापासूनच हिंदू वैदिक वास्तूंना आणि वस्तूंना आपल्या नावावर करून श्रेय लाटण्याचे प्रकार असंख्य वेळा झालेले आहेत.

"मोपल्यांचे बंड" साठी स्थळ आहे ते दक्षिण भारतातील. उत्तमोत्तम आणि एकाहून एक प्रसिद्ध हिंदू देवस्थानं असलेल्या, पण तरीही जेथील हिंदूंच्या वेदना सहजपणे उत्तरेला ऐकू जात नाहीत अशा प्रदेशात. हा ही योगायोग म्हणायचा बहुतेक. कित्येक वर्षांपूर्वी घडून गेलेल्या या गोष्टी किती लोकांनी कानावरसुद्धा घेतल्या असतील माहित नाही. नमूद करणे दूरच.

स्वातंत्र्याच्या आसपास सीमेवर अशा कित्येक घटना घडलेल्या अनेकदा लोकांसमोर आलेल्या आहेत. या न त्या अनेक माध्यमातून. पण स्वातंत्र्यापूर्वीच जन्म झालेल्या आणि वेग घेणाऱ्या घटनांना हिंदू समाजाने कधी मनावर घेतलंच नाही, हे इतक्या परखडपणे सांगायला सावरकरच हवेत.

आम्ही स्वतः दुसर्यांचा खोड्या काढत नाही याचा हिंदूंना सार्थ अभिमान आहे; यावर पुस्तक सरळच बोट ठेवतं. पण कमीतकमी इतरेजन खोड्या काढीत असतील तर ते कानाआड करून आणि हातावर हात धरून स्वस्थ तरी बसू नये. बांग्लादेशी हिंदूंच्या व्यथा समजून घेऊन व्यक्त करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल एका मुस्लीम लेखिकेला भारतात शरण घ्यावी लागते, आणि तरीही आमचा हिंदूबहुल देश त्यामागचं गांभीर्य समजून घेऊ शकला नाही. 

अर्थात "मोपल्यांचे बंड" हे हिंदूंच्या निष्क्रियतेइतकंच त्यांच्यातील स्वार्थी दुहीवर केलेलं विधान आहे. इतिहासाची साक्ष देऊन हिंदूंच्या धर्माभिमानाला आणि एकजूट शस्त्रसज्जतेला साद घालणारं रणशिंग आहे जणू.
सावरकरी भाषेमुळे त्याला धार आहे, स्पष्टवक्तेपणा आहे, नेमकेपणा आहे आणि अचूक नेमही आहे.

सोनेरी चंदेरी


पुस्तकाच्या मलपृष्ठावर पुस्तकाची ओळख करून देताना म्हटलंय, "सेलिब्रिटी मधलं माणूसपण शोधण्याचं, टिपण्याच आणि शब्दांच्या माध्यमातून वाचकापर्यंत पोचवण्याचं कसब ललिता ताम्हणे  यांना साधलंय." पुस्तकाला याचा "बोलका प्रत्यय" म्हटलंय. जे वाचताना आपल्याला शंभर टक्के पटत. किंबहुना पुन्हा पुन्हा पटत राहत.

मुळात चंदेरी दुनियेमागच्या कथांमध्ये सामान्यांना भयंकर रस. त्यात प्रस्तावनेतच सरळ सरळ सांगून टाकलंय की यात गुपितच गुपितं आहेत. पण जसजसं एकेक पान उलटत गेले तसं माझ्याच लक्षात आलं, गुपितं समजण्याची हौस हा किती क्षुद्रपणा आहे. त्या देखण्या चेहऱ्यामागची तितकीच किंवा त्याहीपेक्षा देखणी माणसं नजरेस पडू लागली आणि मी आपोआप त्यात हरवत गेले. मीनाकुमारी, दीप्ती नवल यांच्या कविता त्यांच्या अभिनयाइतक्याच सुंदर असतील असं मला माहीतच नव्हतं. खरं तर त्यांच्या कविताही आहेत हेच माहित नव्हतं.


लोग एकही नजरसे देखते हैं 
औरत और मर्द के रिश्ते को 
क्योंकी उसे नाम दे सकते हैं ना 
नामों से बंधे बेचारे यह लोग 

त्यांच्या प्रेमाच्या कथा ऐकलेल्या होत्या आणि त्याचं नवल, कुतूहल, आकर्षण, कौतुक असं सगळं असून सुद्धा त्यांच्या त्या प्रेमाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन बदलून गेला. या सगळ्याच्या बरोबरचा आणि पलीकडचा एक आदर आला.

कलाकार मूडी असतात, लहरी असतात असं काय काय ऐकत आले होते मी. चुकून एखादेवेळी विचार यायचा त्यांच्या माणूस असण्याचा; पण तो तितकाच चुकार असलेला विचार, क्षणात विरूनसुद्धा जायचा. या पुस्तकाने मात्र त्यांच्या माणूसपणाचं भान ठेवण्याची खात्री पटवली आणि महत्त्वसुद्धा. त्यांच्या स्वभावाला असलेल्या आणि  क्वचितच सामान्यांच्या समोर आलेल्या सुंदर छटा सहज लक्षात आणून दिल्या. त्यांच्या लहरी, त्यांचे मूड्स, यामागे त्यांचीही काही अतिशय अस्वस्थ कारणे असू शकतात; अगदी जशी तुमची-आमची असतात अशीच. त्यांच्या आयुष्यालाही तसेच चढ उतार असतात. त्यांनाही तशीच जिद्द ठेवावी लागते. आणि एवढ्या खटाटोपानंतरही, कधी कधी त्यांनाही अपयशाचा सामना करावा लागतो.

असं म्हणतात, "Winner is just like everyone else, only the one who didn't quit". या पुस्तकाने माझी या वाक्याशी एक नवी ओळख करून दिली. मनाला भावणाऱ्या या सेलेब्रिटीजचे हे अगदी वेगळे पैलू. म्हटलं तर जिद्दी म्हटलं तर हळवे. मानी. वक्तशीर, शिस्तीचे, वचन पाळणारे आणि दिलदारपणे अटी मोडणारे सुद्धा. कलाकार आहेत म्हणून की कोणास ठाऊक, पण सगळेच संवेदनशील. 


जब बहुत कुछ कहने को जी चाहता है ना 
तब कुछ भी कहने को जी नहीं चाहता 

खरं तर सगळेच लेख त्या त्या सेलेब्रिटीजना उलगडत नेणारे आहेत पण त्यातही, स्पर्शून जाणारे म्हणजे "कमाल अमरोही", "सायरा बानू", "हेमा मालिनी" "रेखा" आणि "रंजना". 
यांच्या स्वभावाच्या अशा बाजू नजरेस पडून थक्क झाले मी. माणूस असाही असू शकतो, इतका मोठा..?? दिसतो, वाटतो किंवा भासतो, दाखवतो त्यापेक्षा इतका वेगळा...
वाचकांच्याच सुदैवाने हे सारे लोक लेखिकेशी जवळीकीने, मोकळेपणाने बोलू शकले असं म्हणायला हवं खरं म्हणजे. कदाचित यामागे ललीताजींची मुलाखतीची पद्धत असावी. फक्त एक "स्टोरी" म्हणून कलाकारांकडे पाहण्याऐवजी, एक माणूस म्हणून त्यांच्याकडे आणि त्यांच्या वैयक्तिक तसच व्यावसायिक आयुष्याकडे त्या पाहत आल्या आहेत. मुखवटे बाजूला ठेवून एखाद्याला समजून घेण्यासाठी काही तासांपेक्षा कमीत कमी काही दिवस देणं आवश्यक आहे; किंबहुना, तसं समजून घेतल्याशिवाय एखाद्याबद्दल जाहीर विधान करणं अयोग्य आहे हे त्यांनी नेहमीच सांभाळलेल दिसतं. 

स्मिता पाटील, नूतन, तनुजा, मीनाक्षी शेषाद्री, दीप्ती नवल, गौतम राजाध्यक्ष, यांच्यावरील लेखातून ललीताजींची त्यांच्या बद्दलची आत्मीयता आणि मैत्री स्पष्ट जाणवत राहते. जवळच्या मित्रमैत्रीणींबद्दल बोलताना त्यांचाही हात सैलावतोच. या 'मुलाखतीपलीकडच्या' माणसांमध्ये आपणच आपल्या नकळत गुंतत जातो. त्यांच्यातले कलाकार आणि सेलेब्रिटीज मागे राहून त्यांच्यातलेही साधेसरळ मैत्र आपल्या नजरेस पडू लागतं. हे पुस्तक या सगळ्यांच्या प्रसिद्धीच्या प्रवासाचं, त्यांच्या भावनिक चढउतारांच आणि कष्टाचं सुद्धा साक्षीदार बनते, आणि आपल्यालाही बनवत. चंदेरी दुनियेतल्या माणसांचं हे सोनेरी पाणी पाहून एकदम खूप छान वाटायला लागतं.

ही माणसं काही अजूनही आहेत, काही मात्र निघून गेलेली. प्रेरणाही देतात आणि संवेदनाही. "They should get their dues" ही भावनाही. लेखांच्या शेवटी मात्र मनात "माणूस" म्हणूनच घर करतात.
मीनाकुमारीच्या या ओळी सुरुवातीलाच भेटतात आणि शेवटानंतरही सोबत करतात.


चाँद तन्हा है आसमां तन्हा 
दिल मिला है कहाँ कहाँ तन्हा 
जिन्दगी क्या इसीको कहते हैं 
जिस्म तन्हा है और जां तन्हा 
राह देखा करेगा सदियों तक 
छोड़ जाएँगे ये जहाँ तन्हा 

Sunday, 27 October 2013

लाडकी

सातवी इयत्तेमध्ये प्रथम भाषा मराठी घेऊन शिकताना एका सुंदर मुलीशी ओळख झाली.. गोपाल नीलकंठ दांडेकरांची मानसकन्या "शितू". तेव्हाची ती अर्थात नुसतीच तोंड ओळख. तिला संपूर्णच जाणून घेण्याची उत्सुकता तर अपार होती पण योग काही येत नव्हता. शितूच्या ओढीने गोनीदांच्या इतर अनेक कादंबऱ्या वाचल्या गेल्या. त्यांच्या शैलीवर अक्षरशः प्रेम जडलं. पण शितूच्या भेटीचा योग काही येईना. मध्यंतरी अनेक लोक माझं गोनीदा प्रेम ऐकून "मग तू शितू वाचली असशीलच" असं विचारायचे मला आणि प्रत्येक वेळी नकार देताना जीव अगदी जळायचा माझा.


हल्ली हल्लीच मात्र आमच्या पत्रिका जुळून आल्या आणि एका पुस्तक प्रदर्शनात शितू नजरेस पडली. मग काय शितूला घरी न आणायला काही कारणच नव्हतं आणि एकाच बैठकीत जेमतेम दोनशे पानांची ती "गाथा" वाचून झाली. खरंतर गोनीदांची शैली आणि शितूची कहाणीच अशी आहे की बैठक मोडताच येत नाही. कोकणच्या मातीवर घडणारी त्यांची ही कथा कोकणाला सुद्धा त्यांचा वेगळा स्पर्श देऊन जात असल्याचा भास होतो. लाल मातीवरच्या एकेका बारकाव्याच अचूक निरीक्षण अनुभवताना सुखद आनंद होत राहतो.

शितूच्या प्रस्तावनेत गोनिदांनी शेवटी म्हटलं आहे "चित्तास अति हळुवारपण आणौनिया शितू वाचावी. ती माझी अत्यंत लाडकी परंतु जन्मभर अतिशय सोसावे लागलेली मानसकन्या आहे" आणि या त्यांच्या शब्दांचा मान ठेवण्यासाठी शितू वाचताना आपल्याला काही करावंच लागत नाही. शितूची कहाणी जशी पुढे सरकत जाते तसतसं मन आपोआप हळुवार होत जातं. तिचा स्वभाव सोशिक तर आहेच पण त्यात कुठेही सहन केल्याचा आव नाही. तिचे भोग आपल्या मनाला भिडतात पण तिच्याचमुळे ते सहजही होऊन जातात. 

फार कमी कादंबऱ्या वाचताना मी रडले आहे. शितू अर्थातच त्यात अंतर्भूत होते. शितू वाचताना कुठेच हुंदका येत नाही; डोळे मात्र शितू वाचून पूर्ण झाल्यावरही झरत राहतात. शितूची आठवण इतकी मनावर रेंगाळते की नंतर कित्येक तास मनावरचा पगडा जात नाही.

प्रेमभावनेचा असा पैलू नजरेत येण्यासाठी गोनीदांचीच दृष्टी हवी आणि तो इतरांना दृष्यमान करवण्यासाठी त्यांचीच भाषा हवी. त्यांचा "धन्यतेचा आनंद" शितूच्या एकेका वाक्यात ओतलेला आहे. त्यांच्या "वेदनाशून्य आसवांनी" शितूचा एकेक अध्याय ओथंबलेला आहे. शितू म्हणजे खरोखरंच गोनीदांची सर्वात आगळीवेगळी अशी निर्मिती आहे.

खिळवून ठेवणाऱ्या कित्येक कादंबऱ्या पहिल्यांदाच इतक्या एकाग्रचित्ताने वाचल्या जातात की दुसऱ्यांदा वाचण्याची गरजच उरत नाही. फारफारतर त्यांचा ठराविक प्रसंग उघडावा आणि वाचावा असं होतं. शितूच्या बाबतीत मात्र मी एकदा ती पूर्ण केली, पहिल्याच वेळी तिचा शब्द न् शब्द स्मरणात कोरला गेला. पण तरीही पुनःपुन्हा त्यानंतर मी ती वाचली आणि प्रस्तावनेपासून शेवटपर्यंत वाचली.

शितू वाचण्यासाठी मला फार वर्षे प्रतीक्षा करावी लागली. पण आता मात्र तिच्या पारायणाने कधीच तृप्ती होऊ नये इतकी ती लाडकी झाली आहे.

Wednesday, 11 April 2012

MALTOVA, BOURNVITA, वगैरे....

त्या वाचनाला खरं तर खूप मोठं 'वाचनमूल्य' नसायचं. "आपके बच्चे को बनाये, taller and stronger and sharper" अशा प्रकारचा काही प्रकाशकाचा वायदा/दावा नसायचा. "बच्चेको" वाचनाची चटक लावणं हा आणि एवढाच त्याचा सद्हेतू आणि सदुपयोग. तो मात्र १००% सफल!!
घ री पहिलं मासिक यायचं - अर्थात आम्हा मुलांसाठी असलेलं पहिलं- ते म्हणजे "चांदोबा". बरं, ते यायचं म्हणजे अगदी खास पाहुण्यासारखं. म्हणजे stand वरच्या पेपर-पुस्तकवाल्याकडून जाऊन आणावं लागायचं. आमच्या 'धावे'च्या अंतरात ते बसत नसे. मग बाबांच्या मागे धोशा लावायचा आणि पुरेशा उत्कंठावर्धक प्रतीक्षेनंतर हातात पडलेला चांदोबाचा अंक जेमतेम अर्धा-एक तास पुरायचा. घरात त्यामागून येऊ लागलेल्या बाल-मासिकांच्या मानाने चांदोबाला भरपूर "पोषणमूल्य" होतं. फोटोवरून चारोळी करण्याच्या स्पर्धा, प्रत्येक अंकात वेगवेगळ्या वनस्पतींची तसंच प्रदेशांची माहिती, असं बरंच "पौष्टिक" मालमसाला असायचा. (अर्थात; गोष्टी वाचून संपल्याशिवाय मी बाकी कशाच्या फंदात पडायचे नाही.) त्यातल्या सगळ्याच गोष्टींना तसं तर अलिखित तात्पर्य असायचं, पण त्यातही एकदम वास्तववादी भाष्य करणारे विक्रम-वेताळ माझ्या खास आवडीचे. चांदोबातल्या विक्रम वेताळानी पंचविशी ऐवजी दोनशे पन्नाशी सुद्धा पार करून झालीय (हल्लीच चांदोबाचा कितीतरी 'शे'वा अंक वाचला मी!!!) पण अजूनही ते तितकेच ताजेतवाने असतात. काही दिवसांपूर्वी बाबांच्या नजरेला चांदोबाचा सर्वात नवीन अंक पडला, आणि आमचा हट्ट आठवला म्हणून कि काय, ते तो घेऊनही आले. चांदोबाने आपला दर्जा खूपच टिकवल्याच पाहून बर वाटलं.
बाल-मासिकांशी अजून जास्त मैत्री झाली ती काकांकडे येणाऱ्या इतर मासिकांमुळे. त्यातल्या त्यात “चंपक” जरा जास्तवेळा भेट द्यायचं, “ठकठक” मात्र त्यामानाने अगदीच “ईद का चांद” होतं. पण चांदोबाच्या आकाराशी या दोन्हीच साम्य असलं तरी ती दोन्ही अगदी “बाल” मासिकं वाटायची मला. म्हणजे निखळ मनोरंजनाला (आणि त्यानिमित्ताने वाचनाची आवड लावण्याला) त्यांचं सर्वस्व वाहिलेलं होतं. उगीच आपले चुकार कोडी, चित्रातले फरक ओळखा वगैरे असायचे. सिद्धार्थकाका, चित्रे पूर्ण करून रंगवा; चंपक मध्ये सामान्यज्ञान पण असायचं. अजूनही असतं. पण माझ्या मताने तरी ते सगळं फारच सोपं असल्याने मला बाळबोध वाटायचं. (कदाचित मी त्यांच्या अपेक्षेपेक्षा मोठी झाल्यानंतर वाचलं असेल!!) याव्यतिरिक्तही घरात बऱ्याच दिवाळी अंकांना “welcome” असायचं. पण ते म्हणजे फक्त उन्हाळी सुट्टीत भेटणाऱ्या बाहेरगावच्या खेळगड्यासारखे; भरपूर मनोरंजन करत वाचनाची आवड सदाबहार ठेवणारे, क्वचित कुणीतरी आठवणीत कायमचे राहून जाणारे.
त्यानंतर, म्हणजे आम्ही साधारण १०-१२ वर्षांच्या झाल्यानंतर, प्रवेश झाला ‘किशोर’ आणि ‘प्रबोधन’ चा! अर्थातच ही मासिकं बालकांसाठी नसून किशोरांसाठी आणि कुमारांसाठी आहेत, त्यामुळे त्याचं वाचनमूल्य आधीच्या “बालमासिक”वर्गीयांशी तुलना करण्यासारखं नाहीच.
'किशोर’ आणि ‘प्रबोधन’मुळे खरंच कितीतरी फरक पडला आणि अजूनही पडतो, “काय वाचावं” याच्या दर्जात. “मोठं होण्याच्या” या टप्प्यावर प्रत्येक मुलामुलीच्या हातात पडलीच पाहिजेत अशी ही मासिकं वाटतात मला. कथा, कविता, लेख, यांच्याच सोबत उत्तमोत्तम चित्रपट आणि पुस्तकांची परीक्षणं, वेगवेगळ्या वस्तू बनवण्याच्या कृती, डोक्याला खाद्य पुरवणाऱ्या विविध स्पर्धा आणि त्यांच्या निकालातून काही अजूनच दर्जेदार; प्रत्येक अंक म्हणजे मेजवानी!!!! पण या दोन्ही मासिकांत मला सर्वाधिक प्रिय असायचं आणि असतं ते म्हणजे “संपादकीय”! ज्ञानदा नाईक (किशोर) आणि महेंद्र सेठीया (प्रबोधन) यांच्या त्या एका संपादकीय लेखासाठी कोणीही अख्खा अंक विकत घ्यावा (आणि नंतर अंकातल्या इतरही लेखनाचा दर्जेदारपणा लक्षात यावा) इतकं मोलाचं!!
या सगळ्याच बाल आणि कुमार मासिकांमधल्या प्रत्येकाला कथांची लेखांची स्वतःची अशी वेगळी शैली किंवा वेगळा प्रकार होता. तशा कथा त्या त्या मासिकाव्यातिरिक्त इतर कुठेही मला वाचायला मिळाल्या नाहीत. (अगदी त्याच लेखकांच्या इतर पुस्तकातून सुद्धा!!) यामागचं गमक मला कधीही उमगलं नसलं तरी वाचनाचा 'तो खास अनुभव' पुन्हा घेण्यासाठी म्हणून ही मासिकं परत परत काढून वाचली जातात. ही सगळी वेगवेगळी मासिकं, अगदी चांदोबा वगैरे पासून प्रबोधनपर्यंत, म्हणजे फक्त वाचनसंस्कार नव्हे तर विविध मार्गांनी “sugarcoated pill” सारखा केलेला ‘जीवनसंस्कार’! त्यांच्या योगाने वाचनाची आणि इतर अनेक छंदांची आवड तर नक्कीच लागते पण त्यासमवेतच कितीतरी जीवनमूल्ये सुद्धा मनात खोलवर रुजतात. घट्ट मूळ धरून नंतर आपल्या कितीतरी निर्णयांना विचारांचा, विवेकाचा आधार देतात.

Wednesday, 19 October 2011

हर हर महादेव!

लहानपणी राम आणि कृष्ण यांच्या नंतरचे पहिले superhero अर्थातच "क्षत्रिय कुलावतंस गोब्राह्मणप्रतिपालक मराठी अस्मितेचा अभिमान" असलेले 'राजाधिराज छत्रपती' शिवाजी महाराजच! जाड-बारीक टायपातली त्यांची बरीच पुस्तकं वाचता यायला लागल्यापासून वाचून झाली होती. 'जाणता राजा' पाहताना ऐन राज्याभिषेकाच्या प्रसंगाला झोपही लागली होती! पण शिवरायांच्या (मला 'शिवाजी महाराज' पेक्षा 'शिवराय' अधिक भारदस्त आणि राजेशाही वाटतं.) चरित्रातली भव्यता आदर्श वाटण्यापेक्षा थोडा धाक, आब आणि अंतर राखणारी वाटली होती.
चौथीनंतरच्या सुट्टीत मी प्रीतमताईकडे काही दिवस राहायला असताना माझ्या हाती 'श्रीमान योगी' लागलं. मी वाचलेली ही बहुधा पहिलीच कादंबरी. अर्थातच 'रणजीत देसाई'सोबत पहिलीच भेट. त्यांची शैली मला तेव्हा फार आवडली याचं कारण बहुतेक हे होतं कि त्यामानाने लहान वयात वाचूनही मला त्या कादंबरीने खिळवून ठेवलं. त्यातला आशय कोणी समजावण्याची तशी गरज भासली नव्हती.

Shriman Yogi : श्रीमान योगी    शिवराय छत्रपती असले तरी सरंजामाआड ते कोणत्याही सामान्य सज्जन माणसासारखे सत्प्रवृत्त होते, सरंजाम ही त्यांची हौस नव्हती. शिवरायांच्या 'क्रियासिद्धिः सत्त्वे' व्यक्तिमत्त्वाची जाणीव मला 'श्रीमान योगी'मुळे अधिक स्पष्टपणे झाली. राजे म्हणून त्यांचं वेगळेपण खूप पुस्तकातून दिसलंय, पण माझ्यासाठी तरी, माणूस म्हणून त्यांचं मोठेपण पहिल्यांदा दाखवलं ते 'श्रीमान योगी'ने. रणजीत देसाईच्या खास अलंकारिक भाषेत शिवरायांच्या आयुष्यातल्या "रम्या कथा" त्यांनी छान विणल्या आहेत.
मी काही या पानावर 'श्रीमान योगी' चं समीक्षण लिहायला नाही लागलेय, पण कथा म्हणून, पुस्तक म्हणून, लिखाणाची शैली वगैरेतून मला जे काही भावलं, स्मरणात ठेवावंसं वाटलं, राहिलं, तेवढं टिपून ठेवण्याचा हा प्रयत्न आहे.

अर्थात शिवरायांवरची आणि इतरही काही पुस्तकं वाचल्यानंतर, मला 'श्रीमान योगी'चं अधिक-उणं ही दिसायला लागलं. "ज्यांनी ज्यांनी राजांचे ते बोल ऐकले त्या सर्वांच्या कातरलेल्या मनातून अश्रू झरत होते" अशासारखी काही वाक्यं मग खूप पुस्तकी वाटली (पुस्तकातली वाक्यं, 'पुस्तकी' वाटायला हरकत असू नये खरं म्हणजे!) पण अपेक्षित परिणाम कदाचित त्यांच्याचमुळे साधता आलाय. 
आणि या सगळ्यानंतर, मी स्वतःशी जेव्हा गोळाबेरीज करते, तेव्हाही 'श्रीमान योगी' नक्कीच वाचा असं सांगावंसं नेहमीच वाटतं. वाचनाच्या क्षेत्रात नवखे असणाऱ्यांनाही या कादंबरीचं नाव नक्की माहित असतं. "इतिहास" असं दावा यावर रणजीत देसाई कधी करतच नाहीत; पण ऐतिहासिक व्यक्तीरेखेवरील कादंबरी म्हणून 'श्रीमान योगी' बऱ्याच वरच्या स्थानावर आहे. "शिवाजी महाराज" हा विषय हेच बहुतेक यामागचं बलस्थान आहे.

Monday, 10 October 2011

पहिला थेंब

अगदी लहान असताना जेवताना, झोपताना, कधी सहज म्हणून, मला सारख्या आईने गोष्टी सांगायला हवं असे.
आईला वेळ मिळत नसेल तर मग आजोबा. ते घरात नसले तर समोरच्या घरातले आबा. माझ्या सुदैवाने समर्थ आळीतल्या आमच्या घराच्या आजूबाजूला आजी-आजोबांची वाण नव्हती. त्यामुळे या न त्या कुठल्या तरी आजोबांना माझ्यासाठी वेळ काढता यायचाच. मग नव्या जुन्या गोष्टी सांगायला किंवा हीच गोष्ट हवी असा हट्ट धरायला कोणाची आडकाठी?
शाळेत जायला आणि लिहा-वाचायला लागले तरीही मी गोष्टी ऐकत असेच. तिथे तर बाई फळ्यावर चित्र अडकवून चित्रकथा सांगायच्या. पण मग गोष्टीमार्फतच स्वावलंबन वगैरेची जाणीव झाल्यावर आपल्या आपण गोष्टी आणि पुस्तकं वाचायला आणखी मजा यायला लागली.
आणि एकदा लागलेलं वाचनवेड मग कधी गेलंच नाही...
सुरुवातीला मोठ्या जाड टायपातली थोर लोकांची चरित्रं, सोमू-दामूच्या किंवा तेनालीरामच्या गोष्टी वाचून झाल्या. मग ती संपली तसा मोर्चा वळला अभ्यासाच्या, म्हणजे फक्त मराठी किंवा परिसर अभ्यास किंवा फारतर इतिहासाच्या पुस्तकाकडे. पण अभ्यासक्रमात जरी ती वर्षभर असली तरी वाचून पुरी करायला मला काही तास पुरायचे. त्यामुळे त्यापुढची पाळी आली ती ताईच्या पुस्तकांची. तिचं मराठीचं पुस्तक वाचताना 'काय वाचतेय्स' असं बाबांनी हटकल्यावर ' अभ्यासाचं वाचतेय - ताईच्या!' असं उत्तर दिलेलं माझ्या लक्षात आहे. पण तरीही आई बाबांनी माझ्या वाचनाला कधी आडकाठी केली नाही.
ताईची पुस्तकं म्हणजे सुद्धा अक्षयभाता नव्हता. सो, तीही संपायचीच. मग दादाच्या (माझ्या मोठ्या चुलत भावाच्या) पुस्तकांकडे माझा मोहरा वळणं स्वाभाविकच होतं. तो आमच्याकडे हायस्कूल मध्ये असताना होता. 
त्याच्या मराठीच्या पुस्तकाने माझी सोनाली सिंहिणीसारख्या लोकांशी ओळख करून दिली.
सरकत जाणाऱ्या वर्षांनी मग अशा कितीतरी पुस्तकांची तोंड-ओळख, ओळख आणि मैत्री करून दिली. मराठी, इंग्रजी, विविध भाषांतल्या अनुवादित अशा पुस्तकांनी; समीक्षणानी, कवितांनी  भाषांशी स्नेह जडवून दिला. चरित्रं, निबंध, लेखसंग्रह, विनोद, ललित.. बालकथा आणि गोष्टीपासून सुरु झालेल्या माझ्या वाचनाला निषिद्ध किंवा नावडतं असं अजूनही काही नाही.
सर्व प्रकारच्या आणि अनेकविध विषयांच्या पुस्तकांचं वाचन करताना, टिपण काढून ठेवायची सवय मात्र कुठेतरी विरत गेली. काढलेली टिपणं सुद्धा हरवली आणि हळहळ मात्र मागे उरली..
वाचन हा माझ्यासाठी नेहमीच एक अनुभव असतो. त्या प्रत्येक अनुभवाची नोंद करून ठेवणं आवश्यक आहे याची जाणीव असूनही त्याकडे दुर्लक्ष होत राहिलं. पण आता मात्र ब्लॉगमुळे मला वाचलेल्या पुस्तकांची, हरवायला अवघड अशी टिपणं करून ठेवायची एक संधी मिळते आहे. यानिमित्ताने काही पुस्तकं परतही वाचली जातील. काही वाचायची वाचायची म्हणून राहिलेली, काही अर्धवट राहिलेली, सारीच मार्गी लागतील. मराठी वाचनाचं प्रमाण सर्वात जास्त असल्यामुळे अर्थातच ब्लॉग मूळ मराठीतच असणार आहे, पण इतर भाषिक पुस्तकं मात्र वर्ज्य असणार नाहीत. 
लहानपणापासूनच प्रसिद्ध पुस्तकं, चरित्रं, आत्म-चरित्रं, कादंबऱ्या, नाटकं, कविता असं बरंच काय-काय वाचायची संधी मिळालीय मला. या टिपकागदावर त्यातलेच काही थेंब टिपून ठेवायचे आहेत.