Sunday, 27 October 2013

लाडकी

सातवी इयत्तेमध्ये प्रथम भाषा मराठी घेऊन शिकताना एका सुंदर मुलीशी ओळख झाली.. गोपाल नीलकंठ दांडेकरांची मानसकन्या "शितू". तेव्हाची ती अर्थात नुसतीच तोंड ओळख. तिला संपूर्णच जाणून घेण्याची उत्सुकता तर अपार होती पण योग काही येत नव्हता. शितूच्या ओढीने गोनीदांच्या इतर अनेक कादंबऱ्या वाचल्या गेल्या. त्यांच्या शैलीवर अक्षरशः प्रेम जडलं. पण शितूच्या भेटीचा योग काही येईना. मध्यंतरी अनेक लोक माझं गोनीदा प्रेम ऐकून "मग तू शितू वाचली असशीलच" असं विचारायचे मला आणि प्रत्येक वेळी नकार देताना जीव अगदी जळायचा माझा.


हल्ली हल्लीच मात्र आमच्या पत्रिका जुळून आल्या आणि एका पुस्तक प्रदर्शनात शितू नजरेस पडली. मग काय शितूला घरी न आणायला काही कारणच नव्हतं आणि एकाच बैठकीत जेमतेम दोनशे पानांची ती "गाथा" वाचून झाली. खरंतर गोनीदांची शैली आणि शितूची कहाणीच अशी आहे की बैठक मोडताच येत नाही. कोकणच्या मातीवर घडणारी त्यांची ही कथा कोकणाला सुद्धा त्यांचा वेगळा स्पर्श देऊन जात असल्याचा भास होतो. लाल मातीवरच्या एकेका बारकाव्याच अचूक निरीक्षण अनुभवताना सुखद आनंद होत राहतो.

शितूच्या प्रस्तावनेत गोनिदांनी शेवटी म्हटलं आहे "चित्तास अति हळुवारपण आणौनिया शितू वाचावी. ती माझी अत्यंत लाडकी परंतु जन्मभर अतिशय सोसावे लागलेली मानसकन्या आहे" आणि या त्यांच्या शब्दांचा मान ठेवण्यासाठी शितू वाचताना आपल्याला काही करावंच लागत नाही. शितूची कहाणी जशी पुढे सरकत जाते तसतसं मन आपोआप हळुवार होत जातं. तिचा स्वभाव सोशिक तर आहेच पण त्यात कुठेही सहन केल्याचा आव नाही. तिचे भोग आपल्या मनाला भिडतात पण तिच्याचमुळे ते सहजही होऊन जातात. 

फार कमी कादंबऱ्या वाचताना मी रडले आहे. शितू अर्थातच त्यात अंतर्भूत होते. शितू वाचताना कुठेच हुंदका येत नाही; डोळे मात्र शितू वाचून पूर्ण झाल्यावरही झरत राहतात. शितूची आठवण इतकी मनावर रेंगाळते की नंतर कित्येक तास मनावरचा पगडा जात नाही.

प्रेमभावनेचा असा पैलू नजरेत येण्यासाठी गोनीदांचीच दृष्टी हवी आणि तो इतरांना दृष्यमान करवण्यासाठी त्यांचीच भाषा हवी. त्यांचा "धन्यतेचा आनंद" शितूच्या एकेका वाक्यात ओतलेला आहे. त्यांच्या "वेदनाशून्य आसवांनी" शितूचा एकेक अध्याय ओथंबलेला आहे. शितू म्हणजे खरोखरंच गोनीदांची सर्वात आगळीवेगळी अशी निर्मिती आहे.

खिळवून ठेवणाऱ्या कित्येक कादंबऱ्या पहिल्यांदाच इतक्या एकाग्रचित्ताने वाचल्या जातात की दुसऱ्यांदा वाचण्याची गरजच उरत नाही. फारफारतर त्यांचा ठराविक प्रसंग उघडावा आणि वाचावा असं होतं. शितूच्या बाबतीत मात्र मी एकदा ती पूर्ण केली, पहिल्याच वेळी तिचा शब्द न् शब्द स्मरणात कोरला गेला. पण तरीही पुनःपुन्हा त्यानंतर मी ती वाचली आणि प्रस्तावनेपासून शेवटपर्यंत वाचली.

शितू वाचण्यासाठी मला फार वर्षे प्रतीक्षा करावी लागली. पण आता मात्र तिच्या पारायणाने कधीच तृप्ती होऊ नये इतकी ती लाडकी झाली आहे.

No comments:

Post a Comment