अगदी लहान असताना जेवताना, झोपताना, कधी सहज म्हणून, मला सारख्या आईने गोष्टी सांगायला हवं असे.
आईला वेळ मिळत नसेल तर मग आजोबा. ते घरात नसले तर समोरच्या घरातले आबा. माझ्या सुदैवाने समर्थ आळीतल्या आमच्या घराच्या आजूबाजूला आजी-आजोबांची वाण नव्हती. त्यामुळे या न त्या कुठल्या तरी आजोबांना माझ्यासाठी वेळ काढता यायचाच. मग नव्या जुन्या गोष्टी सांगायला किंवा हीच गोष्ट हवी असा हट्ट धरायला कोणाची आडकाठी?
शाळेत जायला आणि लिहा-वाचायला लागले तरीही मी गोष्टी ऐकत असेच. तिथे तर बाई फळ्यावर चित्र अडकवून चित्रकथा सांगायच्या. पण मग गोष्टीमार्फतच स्वावलंबन वगैरेची जाणीव झाल्यावर आपल्या आपण गोष्टी आणि पुस्तकं वाचायला आणखी मजा यायला लागली.
आणि एकदा लागलेलं वाचनवेड मग कधी गेलंच नाही...
सुरुवातीला मोठ्या जाड टायपातली थोर लोकांची चरित्रं, सोमू-दामूच्या किंवा तेनालीरामच्या गोष्टी वाचून झाल्या. मग ती संपली तसा मोर्चा वळला अभ्यासाच्या, म्हणजे फक्त मराठी किंवा परिसर अभ्यास किंवा फारतर इतिहासाच्या पुस्तकाकडे. पण अभ्यासक्रमात जरी ती वर्षभर असली तरी वाचून पुरी करायला मला काही तास पुरायचे. त्यामुळे त्यापुढची पाळी आली ती ताईच्या पुस्तकांची. तिचं मराठीचं पुस्तक वाचताना 'काय वाचतेय्स' असं बाबांनी हटकल्यावर ' अभ्यासाचं वाचतेय - ताईच्या!' असं उत्तर दिलेलं माझ्या लक्षात आहे. पण तरीही आई बाबांनी माझ्या वाचनाला कधी आडकाठी केली नाही.
ताईची पुस्तकं म्हणजे सुद्धा अक्षयभाता नव्हता. सो, तीही संपायचीच. मग दादाच्या (माझ्या मोठ्या चुलत भावाच्या) पुस्तकांकडे माझा मोहरा वळणं स्वाभाविकच होतं. तो आमच्याकडे हायस्कूल मध्ये असताना होता.
त्याच्या मराठीच्या पुस्तकाने माझी सोनाली सिंहिणीसारख्या लोकांशी ओळख करून दिली.
सरकत जाणाऱ्या वर्षांनी मग अशा कितीतरी पुस्तकांची तोंड-ओळख, ओळख आणि मैत्री करून दिली. मराठी, इंग्रजी, विविध भाषांतल्या अनुवादित अशा पुस्तकांनी; समीक्षणानी, कवितांनी भाषांशी स्नेह जडवून दिला. चरित्रं, निबंध, लेखसंग्रह, विनोद, ललित.. बालकथा आणि गोष्टीपासून सुरु झालेल्या माझ्या वाचनाला निषिद्ध किंवा नावडतं असं अजूनही काही नाही.
सर्व प्रकारच्या आणि अनेकविध विषयांच्या पुस्तकांचं वाचन करताना, टिपण काढून ठेवायची सवय मात्र कुठेतरी विरत गेली. काढलेली टिपणं सुद्धा हरवली आणि हळहळ मात्र मागे उरली..
वाचन हा माझ्यासाठी नेहमीच एक अनुभव असतो. त्या प्रत्येक अनुभवाची नोंद करून ठेवणं आवश्यक आहे याची जाणीव असूनही त्याकडे दुर्लक्ष होत राहिलं. पण आता मात्र ब्लॉगमुळे मला वाचलेल्या पुस्तकांची, हरवायला अवघड अशी टिपणं करून ठेवायची एक संधी मिळते आहे. यानिमित्ताने काही पुस्तकं परतही वाचली जातील. काही वाचायची वाचायची म्हणून राहिलेली, काही अर्धवट राहिलेली, सारीच मार्गी लागतील. मराठी वाचनाचं प्रमाण सर्वात जास्त असल्यामुळे अर्थातच ब्लॉग मूळ मराठीतच असणार आहे, पण इतर भाषिक पुस्तकं मात्र वर्ज्य असणार नाहीत.
लहानपणापासूनच प्रसिद्ध पुस्तकं, चरित्रं, आत्म-चरित्रं, कादंबऱ्या, नाटकं, कविता असं बरंच काय-काय वाचायची संधी मिळालीय मला. या टिपकागदावर त्यातलेच काही थेंब टिपून ठेवायचे आहेत.
ज्ञानू हा ब्लॉग वाचताना मला माझ्याच बद्दल वाचतेय अस वाटल. आजोबांच्या गोष्टी सांगून संपल्या,
ReplyDeleteनवीन गोष्टींसाठी त्यांना पुस्तकातून वाचून दाखवायला लागलं ,थोड्या दिवसांनी त्यांच्या कृत्रिम डोळ्यांसहीतही त्रास व्हायला लागला, रेडिओवरच्या विक्रम वेताळाच्या गोष्टीही पुरेशा होईनात तेव्हा अस्मादिकांचा मोहरा पुस्तकांकडे वळला आणि मग मागे वळण झालच नाही.
काय वाट्टेल ते, हो अगदी वाट्टेल ते पांढऱ्यावर काळ चालायचं वाचायला. अगदी दुकानात आलेल्या राद्दीचीही उलटपालट व्हायची, आणि मग आईच्या प्रवचनाचा एक तास ठरलेला. पण हातात काही मिळाल तर ते प्रवचनच काय जगाचा विसर पडलेला असायचा. आई म्हणायची,”हं आता बापाशीसारख्या तगाड हातात घेवन बसात, पोट भरतला तेनी”. आता हे म्हणजे ‘लेकी बोले सुने लागे
होतं हे कळलंच असेल तुला. (तगाड म्हणजे पुस्तक : आईच्या शब्दकोशातील काही शब्द मी फक्त तिच्याच तोंडून ऐकलेत, मालवणी भाषेशी याच काहीही संबंध नाही ). खरच पण,पोट आणि मन कधी भरलच नाही. तुझ्या टीपाकागदाच्या निमित्ताने माझीही फिरून आनंदयात्रा होईल. तुला मनापासून आशीर्वाद वत्सा !
dhanywad boki..
ReplyDeleteaple ashirwad asech sadaiw mathyawar astil tar,
yash aplya payashi anun thewta yeilach; wagire wagire....
pan kharach..
tipkagad sarkha blog lihayla ghetlay khara, pan sobat madat ani parikshanachi nity garaj ahe..
te milat raho hich namr winanti..