मुळात चंदेरी दुनियेमागच्या कथांमध्ये सामान्यांना भयंकर रस. त्यात प्रस्तावनेतच सरळ सरळ सांगून टाकलंय की यात गुपितच गुपितं आहेत. पण जसजसं एकेक पान उलटत गेले तसं माझ्याच लक्षात आलं, गुपितं समजण्याची हौस हा किती क्षुद्रपणा आहे. त्या देखण्या चेहऱ्यामागची तितकीच किंवा त्याहीपेक्षा देखणी माणसं नजरेस पडू लागली आणि मी आपोआप त्यात हरवत गेले. मीनाकुमारी, दीप्ती नवल यांच्या कविता त्यांच्या अभिनयाइतक्याच सुंदर असतील असं मला माहीतच नव्हतं. खरं तर त्यांच्या कविताही आहेत हेच माहित नव्हतं.
लोग एकही नजरसे देखते हैं
औरत और मर्द के रिश्ते को
क्योंकी उसे नाम दे सकते हैं ना
नामों से बंधे बेचारे यह लोग
त्यांच्या प्रेमाच्या कथा ऐकलेल्या होत्या आणि त्याचं नवल, कुतूहल, आकर्षण, कौतुक असं सगळं असून सुद्धा त्यांच्या त्या प्रेमाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन बदलून गेला. या सगळ्याच्या बरोबरचा आणि पलीकडचा एक आदर आला.
कलाकार मूडी असतात, लहरी असतात असं काय काय ऐकत आले होते मी. चुकून एखादेवेळी विचार यायचा त्यांच्या माणूस असण्याचा; पण तो तितकाच चुकार असलेला विचार, क्षणात विरूनसुद्धा जायचा. या पुस्तकाने मात्र त्यांच्या माणूसपणाचं भान ठेवण्याची खात्री पटवली आणि महत्त्वसुद्धा. त्यांच्या स्वभावाला असलेल्या आणि क्वचितच सामान्यांच्या समोर आलेल्या सुंदर छटा सहज लक्षात आणून दिल्या. त्यांच्या लहरी, त्यांचे मूड्स, यामागे त्यांचीही काही अतिशय अस्वस्थ कारणे असू शकतात; अगदी जशी तुमची-आमची असतात अशीच. त्यांच्या आयुष्यालाही तसेच चढ उतार असतात. त्यांनाही तशीच जिद्द ठेवावी लागते. आणि एवढ्या खटाटोपानंतरही, कधी कधी त्यांनाही अपयशाचा सामना करावा लागतो.
असं म्हणतात, "Winner is just like everyone else, only the one who didn't quit". या पुस्तकाने माझी या वाक्याशी एक नवी ओळख करून दिली. मनाला भावणाऱ्या या सेलेब्रिटीजचे हे अगदी वेगळे पैलू. म्हटलं तर जिद्दी म्हटलं तर हळवे. मानी. वक्तशीर, शिस्तीचे, वचन पाळणारे आणि दिलदारपणे अटी मोडणारे सुद्धा. कलाकार आहेत म्हणून की कोणास ठाऊक, पण सगळेच संवेदनशील.
जब बहुत कुछ कहने को जी चाहता है ना
तब कुछ भी कहने को जी नहीं चाहता
खरं तर सगळेच लेख त्या त्या सेलेब्रिटीजना उलगडत नेणारे आहेत पण त्यातही, स्पर्शून जाणारे म्हणजे "कमाल अमरोही", "सायरा बानू", "हेमा मालिनी" "रेखा" आणि "रंजना".
यांच्या स्वभावाच्या अशा बाजू नजरेस पडून थक्क झाले मी. माणूस असाही असू शकतो, इतका मोठा..?? दिसतो, वाटतो किंवा भासतो, दाखवतो त्यापेक्षा इतका वेगळा...
वाचकांच्याच सुदैवाने हे सारे लोक लेखिकेशी जवळीकीने, मोकळेपणाने बोलू शकले असं म्हणायला हवं खरं म्हणजे. कदाचित यामागे ललीताजींची मुलाखतीची पद्धत असावी. फक्त एक "स्टोरी" म्हणून कलाकारांकडे पाहण्याऐवजी, एक माणूस म्हणून त्यांच्याकडे आणि त्यांच्या वैयक्तिक तसच व्यावसायिक आयुष्याकडे त्या पाहत आल्या आहेत. मुखवटे बाजूला ठेवून एखाद्याला समजून घेण्यासाठी काही तासांपेक्षा कमीत कमी काही दिवस देणं आवश्यक आहे; किंबहुना, तसं समजून घेतल्याशिवाय एखाद्याबद्दल जाहीर विधान करणं अयोग्य आहे हे त्यांनी नेहमीच सांभाळलेल दिसतं.
स्मिता पाटील, नूतन, तनुजा, मीनाक्षी शेषाद्री, दीप्ती नवल, गौतम राजाध्यक्ष, यांच्यावरील लेखातून ललीताजींची त्यांच्या बद्दलची आत्मीयता आणि मैत्री स्पष्ट जाणवत राहते. जवळच्या मित्रमैत्रीणींबद्दल बोलताना त्यांचाही हात सैलावतोच. या 'मुलाखतीपलीकडच्या' माणसांमध्ये आपणच आपल्या नकळत गुंतत जातो. त्यांच्यातले कलाकार आणि सेलेब्रिटीज मागे राहून त्यांच्यातलेही साधेसरळ मैत्र आपल्या नजरेस पडू लागतं. हे पुस्तक या सगळ्यांच्या प्रसिद्धीच्या प्रवासाचं, त्यांच्या भावनिक चढउतारांच आणि कष्टाचं सुद्धा साक्षीदार बनते, आणि आपल्यालाही बनवत. चंदेरी दुनियेतल्या माणसांचं हे सोनेरी पाणी पाहून एकदम खूप छान वाटायला लागतं.
ही माणसं काही अजूनही आहेत, काही मात्र निघून गेलेली. प्रेरणाही देतात आणि संवेदनाही. "They should get their dues" ही भावनाही. लेखांच्या शेवटी मात्र मनात "माणूस" म्हणूनच घर करतात.
मीनाकुमारीच्या या ओळी सुरुवातीलाच भेटतात आणि शेवटानंतरही सोबत करतात.
चाँद तन्हा है आसमां तन्हा
दिल मिला है कहाँ कहाँ तन्हा
जिन्दगी क्या इसीको कहते हैं
जिस्म तन्हा है और जां तन्हा
राह देखा करेगा सदियों तक
छोड़ जाएँगे ये जहाँ तन्हा
No comments:
Post a Comment