Thursday, 20 August 2026

गुलाबजाम the movie

आज मराठी सिनेमा पहिला खूप दिवसांनी. जवळजवळ वर्षभराने. 
नाव गुलाबजाम. २०१८ चा आहे. 
आणि कमीतकमी शब्दात व्यक्त करायचं तर फारच सुंदर आहे.

काही काही सिनेमे असे असतात की त्यात भावनिक उलाढाली नसतात पण हळवे तरंग मात्र असतात. कदाचित हे वाक्यही चुकलंय इथे. पण असंच काहीतरी म्हणायचंय. 
Thrill नाही, suspense नाही, adventure नाही, romance नाही, काळजाला हात घालून अश्रू पिळून काढेल असंही काही नाही.... पण काळजात घर मात्र करून जाईल असं काहीतरी....
शांतपणे पुढे सरकणारी कथा, रहस्यमयी नसून सुद्धा खुर्चीला खिळवून ठेवते.
सुरेख दिग्दर्शन, आणि चपखल अभिनय. 
या क्षणी इतकं स्थिर वाटतंय की फार व्यक्त सुद्धा व्हावंसं वाटत नाहीये. 
सिनेमे पाहून आपण सुन्न होतो, दुःखी होतो, आनंदी होतो, हसून बेजार झालेले असतो, उत्तेजित होतो, असं बरंच काही सिनेमे संपल्यावर वाटतं.
पण सिनेमा संपल्यावर शांत आणि प्रसन्न वाटलं असं फार कमी वेळा होतं. गुलाबजाम हा तो दुर्मिळ अनुभव आहे.

Tuesday, 11 August 2026

Diary of Anne Frank

जवळजवळ महिनाभर इटलीच्या जेनोआ शहरात लॉकडाऊन मुले घरात अडकून पडलो असताना मध्येच दृष्टीस पडलं, किंडलच्या ग्रंथालयात कधीपासून घेऊन ठेवलेलं "डायरी ऑफ ऍन फ्रॅंक"; आणि कित्येक वर्षांनंतर मी ते परत एकदा वाचलं.
सहावीमध्ये असताना आम्हाला या पुस्तकातला काही भाग पाठयउतारा म्हणून अभ्यासाला होता. तो शिकवताना आमच्या शिक्षकांनी "आम्हाला आवर्जून संपूर्ण वाचावं" अशी शिफारस केलेलं हे पुस्तक त्यानिमित्ताने बऱ्यापैकी लवकर माझ्या हाताला लागलं. किशोरवयात वाचलेल्या, उपदेशाशिवाय प्रेरणा देणाऱ्या, वस्तुस्थितीची आगळी जाणीव देणाऱ्या, आणि (सत्यघटनेचा भाग असल्याने असेल कदाचित) मनाला भिडलेल्या काही मोजक्या पुस्तकांपैकी हे एक आहे. माझ्याच वयाच्या एका मुलीनं स्वतःच्या रोजनिशीत लिहिलेले विचार मला रोजनिशी लिहिण्याचा वेगळा प्रभाव तर देऊन गेलेच शिवाय युद्धकाळात तिच्या वाट्याला आलेल्या गोष्टी वाचताना स्वतःच्या सुदैवी असण्याची पुनःपुन्हा नव्याने जाणीव होत राहिली.