हल्लीच एक सुंदर चित्रपट पाहिला. सुंदर पुस्तकावरचा सुंदर चित्रपट म्हणून माझ्यासाठी जास्त महत्त्वाचा. क्लासिक इंग्लिश. "Little Women".
सर्वप्रथम या 'लिट्ल विमेन'ना मनापासून सॉरी. कारण ही माझी पोस्ट फार आधीच यायला हवी होती. मी वाचलेल्यापैकी दुसरी तिसरी कादंबरी असेल ही. 'शांताबाई शेळकें'नी अनुवाद केलेली 'लुईसा मे अल्कॉट' च्या दोन पुस्तकांची एकत्रित कादंबरी "चौघीजणी".
या चार पोरींशी माझी ओळख "प्रबोधन" मासिकाच्या पुस्तक-विशेष मधून झाली होती. पण ती नुसती तोंडओळख. मग त्यावर आईसोबत चर्चा. तिचासुद्धा "प्रत्येकाने वाचायलाच हवं" असाच विचार. पुढे सातवीनंतरच्या उन्हाळी सुट्टीत आजीच्या पलंगाशेजारी (तिच्या हाकेच्या अंतरावर) बसल्या बसल्या वाचायला पुस्तकं हुडकताना कपाटात "चौघीजणी" हातास लागलं, आणि मग अख्खी सुट्टी त्या पुस्तकाची नुसती पारायणं झाली! आणि फक्त त्या सुट्टीतच नव्हे तर नंतरच्या प्रत्येक उन्हाळी सुट्टीत आणि आम्ही पुस्तक विकत घेतल्यावर तर वेळ मिळेल तेव्हा आणि नाही मिळाला तर वेळ काढूनसुद्धा!!! (फारच 'आणि' झाले!!)
मार्च मुलींच्या रोजच्या आयुष्यात, किशोरावस्थेतून तारुण्यात पदार्पणाभोवती तसंच त्यानंतर घडत जाणाऱ्या या घटना रोमांचक नाहीत, थरारक नाहीत पण तरीही सुंदर आहेत. साध्या-सरळ असल्या, तुमच्या-आमच्यासोबत घडणाऱ्या असल्या तरी किंवा त्यामुळेच, जवळच्या आहेत! लुईसा अल्कॉटच्या मूळ रंजक लिखाणाला शांताबाईंच्या प्रतिभेची जोड म्हणजे अगदी दुग्धशर्करा योगच आहे!
पुढे जाऊन (म्हणजे मी इंग्रजी वाचायला लागल्यानंतर) मी मूळ 'लिट्ल विमेन' पुस्तक सुद्धा घेऊन वाचलं आणि मला तेही अतिशय भावलं. पण पुन्हा पुन्हा जेव्हा वाचायचं असतं, 'गरज' म्हणून जे वाचायचं असतं (फक्त हाडाच्या वाचकालाच ही भावना नेमकी कळणं शक्य आहे) , 'पुस्तक हेच मित्र' म्हणून ज्याकडे जायचं मला असतं ते मात्र 'चौघीजणी'च!!! (हा कदाचित मातृभाषेच्या वात्सल्याचा परिणामही असू शकेल..)
पुढे जाऊन (म्हणजे मी इंग्रजी वाचायला लागल्यानंतर) मी मूळ 'लिट्ल विमेन' पुस्तक सुद्धा घेऊन वाचलं आणि मला तेही अतिशय भावलं. पण पुन्हा पुन्हा जेव्हा वाचायचं असतं, 'गरज' म्हणून जे वाचायचं असतं (फक्त हाडाच्या वाचकालाच ही भावना नेमकी कळणं शक्य आहे) , 'पुस्तक हेच मित्र' म्हणून ज्याकडे जायचं मला असतं ते मात्र 'चौघीजणी'च!!! (हा कदाचित मातृभाषेच्या वात्सल्याचा परिणामही असू शकेल..)
या पोरींची रूपं शांताबाई सुरुवातीलाच आपल्याला सांगून टाकतात, पण तेव्हाच हे ही सांगतात की त्यांचे स्वभाव कथेच्या ओघातच उलगडत जातील. आणि अगदी त्यांनी म्हटल्याप्रमाणेच, या सगळ्यांची व्यक्तिमत्त्वं आपल्यासमोर अलवार उमलत जातात. कथा पुढे सरकताना आपण नकळत 'मार्च पोरीं'मध्ये गुंतत जातो. जबाबदार असूनही कुटुंबाच्या निसटलेल्या श्रीमंतीच्या आठवणीत चुकचुकणारी आणि पुढे सहजपणे, श्रीमंती स्थळे सोडून, मध्यमवर्गीय पण प्रेमळ 'जॉन ब्रूक' सोबत संसारात रमणारी मेग (मार्गारेट), पुरुषी म्हणवण्यात, सवयीत, वागण्यात आनंद असलेली आणि हळूहळू एका बिनधास्त मोकळ्या तरुणीत रुपांतर होत गेलेली जो (जोसेफाईन), हळुवार जीव लावता-लावता एकदम जीवाला चटकाच लावून जाणारी साधी भाबडी बेथ (एलिझाबेथ), चिवचिव करता करता अचानक सुंदर आणि समजूतदार होऊन जाणारी एमी.
या पोरींच्या जोडीला, कथेइतकाच पोरींचा आणि परिवाराचा अविभाज्य भाग असणारा लॉरी; सळसळता, उत्साही, थोडा अविचारी, थोडा समजूतदार पण अतिशय लाघवी आणि लोभस! मार्च घराचा भिंतीइतका सहज भाग असलेली हना, कडक शिस्तीचे असले तरी संवेदनशील मिस्टर लॉरेन्स. अबोल, हळवा आणि मेगच्या प्रेमात असूनही मर्यादशील असा जॉन ब्रूक. पटकन येऊन झटकन महत्त्वाचे होणारे 'प्रोफेसर भाअर', डेझी आणि डेमी! आणि हो, माझ्यातल्या (तेव्हाच्या) 'टीनएजर'ला 'खडूस म्हातारी'ची प्रतिमा अचूक रेखून देणारी आणि पुढेपुढे (मला) थोडी थोडी कळू लागणारी 'आंट मार्च'! (खरं सांगायचं तर, तेव्हा 'आंट मार्च'ची 'खडूस' हीच प्रतिमा इतकी कोरली गेली मनावर की बाकी सगळ्यांचे मनावरचे ठसे बदलत गेले तरी आंट मात्र अजूनही 'खडूस'च राहिलीये कुठेतरी. म्हणजे तिने 'जो'ला तिची भली गडगंज 'प्लमफील्ड' इस्टेट दान करूनसुद्धा तिच्या नशिबात 'उदार' हे लेबल माझ्याकडून नाहीये; बिचारी!)
एकोणिसाव्या शतकातील अमेरिकन आणि ब्रिटीश श्रीमंतांच्या संस्कृतीची चुणूक दर्शवणारी मॉफट, गार्डीनर, वॉगन मंडळींचा सुद्धा उल्लेख हवाच.
किशोरावस्थेकडून तरुण होत जाणाऱ्या मुलामुलींसोबत घडणारे हे प्रसंग, त्यांच्या महत्त्वाकांक्षा, युक्त्या-कल्पना, त्यांच्या चुका, जबाबदारीच्या जाणीवा आणि त्यानंतरच्या सुधारणा हे सगळे फारच ओळखीचे वाटतात. यातल्या माणसांतला जिव्हाळा गोड आहे, दाट आहे पण त्याचं अजीर्ण होत नाही. त्यांची भांडणं-गैरसमज हे अगदी 'आपल्याच' वाटणाऱ्या पद्धतीने कोणत्याही उपदेश किंवा तात्पर्याशिवाय सुटतात. या पुस्तकातल्या कोणत्याही घटनांबद्दल लिहिण्याऐवजी त्यांच्या परिणामांबद्दल लिहून मी बरोबर करतेय की चूक माहित नाही, पण माझ्या मते प्रसंगान्बद्दल लिहिलेलं वाचण्याऐवजी मूळ प्रसंग वाचणे केव्हाही अधिक उत्तम. शिवाय, या पुस्तकाचा मला इतका लळा आहे की त्यावर किती आणि काय लिहू असं होतंय माझ्यासाठी. म्हणजे मी एका प्रसंगाचा उल्लेख केला तर दुसऱ्यावर अन्याय झाल्याची बोच राहील मला. (आणि 'एवढं' लिहूनसुद्धा काही व्यक्तींचा उल्लेखचं राहिल्यासारखं मला वाटतंय!)
हे झालं पुस्तकाबद्दल, आता चित्रपटाबद्दल. अर्थातच इतक्या चित्तवेधक कादंबरीवर (आणि त्या कथेवर आधारित) अनेकदा चित्रपट बनले. त्यापैकी १९९४मध्ये चित्रपट प्रदर्शित झालेला चित्रपट मी पाहिला.

गूगलवर मी जेव्हा शोधत होते तेव्हा या चित्रपटाबद्दल 'क्रिटिक रिव्ह्यू'मध्ये म्हटलं होतं, "लिट्ल विमेन आणि गुड वाईव्ज या पुस्तकांवर तोपर्यंत बनू शकणारा हा सर्वात सुंदर चित्रपट आहे" आणि मी या मताशी पूर्णपणे सहमत आहे (वेल, मी इतर चित्रपट पाहिले नाहीयेत). किंबहुना मी म्हणेन पुस्तक वाचताना 'वाचकाचे कल्पनास्वातंत्र्य' या नावाखाली मी काही 'काहीच्या काही' कल्पना केल्या होत्या. (म्हणजे एकोणिसाव्या शतकातली माझी 'जो' बरेचदा जीन्स किंवा हाफ-स्कर्ट मध्ये असायची आणि लॉरी टी-शर्टमध्ये; आंट मार्च उगाचच पायाने अधू होती, मिस्टर मार्च माझ्यासाठी कायम धर्मगुरूच्या पायघोळ झग्यात असायचे तर मिस्टर लॉरेन्स नेहमी टाय आणि कोटात.) या माझ्या भ्रमांना चित्रपटाने छेद दिला तरी त्या विरूप होण्याऐवजी सुधारल्या.
चित्रपटातली सगळी मंडळी (त्यांना 'पात्र' म्हणणं मला जड जातंय.) म्हणजे अगदी माझ्या मनाशी एकरूप होत गेलेलीच - चार पोरी आणि त्यांच्या आजूबाजूची - माणसं आहेत. तत्कालीन पद्धतीन्प्रमाणे सरसकट लांब लांब ड्रेसेसमध्ये वावरणाऱ्या असल्या तरी मार्च मुली त्यांच्या वागण्यातून त्यांचे वेगवेगळे स्वभाव तितकेच स्पष्ट करतात. माध्यमाच्या बदलासोबत कथेतले काही प्रसंग (आणि काही दुवे) वगळावे किंवा बदलावे लागले आहेत. पण तरीही मार्च पोरी, मार्मी मार्च आणि त्यांच्यासोबत लॉरी, हना, मिस्टर लॉरेन्स, मिस्टर मार्च, आंट मार्च, मॉफट-गार्डीनर-वॉगन कुटुंबे, मिसेस कर्क आणि प्रोफेसर भाअर हे सगळे जसे वाचताना मनासमोर येतात तसेच वागतात. त्यांच्या दिसण्यातल्या (कल्पनेच्या भरात झालेल्या) चुका सुधारताना ते कुठेही परके होत नाहीत. (अर्थात, चित्रपट कितीही सुरेख असला तरी जातिवंत वाचक असल्याप्रमाणे माझं पहिलं प्रेम पुस्तकावरच!)
सुदैवाने मला खूपच उत्तमोत्तम पुस्तकं वाचायला मिळाली आहेत; पण चार पोरी माझ्यासाठी फक्त पुस्तकाची पात्र नाहीयेत. लुईसा अल्कॉटने मार्च बहिणी आणि लॉरीच्या व्यक्तिरेखा या ती, तिच्या बहिणी आणि त्यांचे शेजारी यांच्यावरून उचलल्या आहेत. पण मार्च मुलींशी माझं मैत्र गहिरं व्हायला त्यांचं मानवी उगमस्थान हेच कारण असावसं वाटत नाही. शांताबाईंची अनुवादशैली तर तोडीचीच (किंवा सरस सुद्धा म्हणता येईल.) पण तेही कारण अपुरंच. मुळात वाचताना वाचकाची पुस्तकासोबत एक वेगळी दुनियाच निर्माण होत असते (माझ्यामते, अपरिहार्यपणे!); तसं 'चौघीजणी'सोबतही माझं 'जग' आहे.
आणि खरंतर, या पुस्तकाशी माझे संबंध केवळ पुस्तक, कथा-कादंबरी अशा स्वरूपाचे उरलेले नाहीयेत. माझ्या किशोर-वयापासून गेली कितीतरी वर्षं हे पुस्तक माझी सोबत करतंय. ही फक्त 'वाचका'ची दुनिया नाहीये आता. कागद आणि काळापलीकडे जाऊन या सगळ्या माणसांशी मी भावनांनी बांधली गेलेय असं वाटतं मला. प्रत्येक माणसावर प्रत्येक पुस्तकाचा होणारा परिणाम वेगळा असतो हे मान्य केलं, तरीही, या पुस्तकाचा तुमच्यावर होणारा परिणाम कसा आहे हे जाणून घेण्यासाठी तरी ते वाचायलाच हवं.
No comments:
Post a Comment