Sunday, 27 September 2015

चार पोरी

हल्लीच एक सुंदर चित्रपट पाहिला. सुंदर पुस्तकावरचा सुंदर चित्रपट म्हणून माझ्यासाठी जास्त महत्त्वाचा. क्लासिक इंग्लिश. "Little Women".

सर्वप्रथम या 'लिट्ल विमेन'ना मनापासून सॉरी. कारण ही माझी पोस्ट फार आधीच यायला हवी होती. मी वाचलेल्यापैकी दुसरी तिसरी कादंबरी असेल ही. 'शांताबाई शेळकें'नी अनुवाद केलेली 'लुईसा मे अल्कॉट' च्या दोन पुस्तकांची एकत्रित कादंबरी "चौघीजणी".

या चार पोरींशी माझी ओळख "प्रबोधन" मासिकाच्या पुस्तक-विशेष मधून झाली होती. पण ती नुसती तोंडओळख. मग त्यावर आईसोबत चर्चा. तिचासुद्धा "प्रत्येकाने वाचायलाच हवं" असाच विचार. पुढे सातवीनंतरच्या उन्हाळी सुट्टीत आजीच्या पलंगाशेजारी (तिच्या हाकेच्या अंतरावर) बसल्या बसल्या वाचायला पुस्तकं हुडकताना कपाटात "चौघीजणी" हातास लागलं, आणि मग अख्खी सुट्टी त्या पुस्तकाची नुसती पारायणं झाली! आणि फक्त त्या सुट्टीतच नव्हे तर नंतरच्या प्रत्येक उन्हाळी सुट्टीत आणि आम्ही पुस्तक विकत घेतल्यावर तर वेळ मिळेल तेव्हा आणि नाही मिळाला तर वेळ काढूनसुद्धा!!! (फारच 'आणि' झाले!!)

"Little Women" आणि "Good Wives" या लुईसा अल्कॉट च्या दोन पुस्तकांचा हा एकत्रित मराठी अनुवाद. चार बहिणी, त्यांची आई, युद्धावर गेलेले वडील असं 'मार्च' कुटुंब, त्यांचा शेजारी 'लॉरी', जॉन ब्रूक, मिस्टर लॉरेन्स, आंट मार्च, आणि अधून मधून ये जा करणारी बाकीची (पात्र)मंडळी यांच्या बरोबर, त्यांच्याभोवती कथा फिरते. आणि ही कथा 'फिरते'; रेंगाळत नाही.

मार्च मुलींच्या रोजच्या आयुष्यात, किशोरावस्थेतून तारुण्यात पदार्पणाभोवती तसंच त्यानंतर घडत जाणाऱ्या या घटना रोमांचक नाहीत, थरारक नाहीत पण तरीही सुंदर आहेत. साध्या-सरळ असल्या, तुमच्या-आमच्यासोबत घडणाऱ्या असल्या तरी किंवा त्यामुळेच, जवळच्या आहेत! लुईसा अल्कॉटच्या मूळ रंजक लिखाणाला शांताबाईंच्या प्रतिभेची जोड म्हणजे अगदी दुग्धशर्करा योगच आहे!

पुढे जाऊन (म्हणजे मी इंग्रजी वाचायला लागल्यानंतर) मी मूळ 'लिट्ल विमेन' पुस्तक सुद्धा घेऊन वाचलं आणि मला तेही अतिशय भावलं. पण पुन्हा पुन्हा जेव्हा वाचायचं असतं, 'गरज' म्हणून जे वाचायचं असतं (फक्त हाडाच्या वाचकालाच ही भावना नेमकी कळणं शक्य आहे) , 'पुस्तक हेच मित्र' म्हणून ज्याकडे जायचं मला असतं ते मात्र 'चौघीजणी'च!!! (हा कदाचित मातृभाषेच्या वात्सल्याचा परिणामही असू शकेल..)

या पोरींची रूपं शांताबाई सुरुवातीलाच आपल्याला सांगून टाकतात, पण तेव्हाच हे ही सांगतात की त्यांचे स्वभाव कथेच्या ओघातच उलगडत जातील. आणि अगदी त्यांनी म्हटल्याप्रमाणेच, या सगळ्यांची व्यक्तिमत्त्वं आपल्यासमोर अलवार उमलत जातात. कथा पुढे सरकताना आपण नकळत 'मार्च पोरीं'मध्ये गुंतत जातो. जबाबदार असूनही कुटुंबाच्या निसटलेल्या श्रीमंतीच्या आठवणीत चुकचुकणारी आणि पुढे सहजपणे, श्रीमंती स्थळे सोडून, मध्यमवर्गीय पण प्रेमळ 'जॉन ब्रूक' सोबत संसारात रमणारी मेग (मार्गारेट), पुरुषी म्हणवण्यात, सवयीत, वागण्यात आनंद असलेली आणि हळूहळू एका बिनधास्त मोकळ्या तरुणीत रुपांतर होत गेलेली जो (जोसेफाईन), हळुवार जीव लावता-लावता एकदम जीवाला चटकाच लावून जाणारी साधी भाबडी बेथ (एलिझाबेथ), चिवचिव करता करता अचानक सुंदर आणि समजूतदार होऊन जाणारी एमी. 

या पोरींच्या जोडीला, कथेइतकाच पोरींचा आणि परिवाराचा अविभाज्य भाग असणारा लॉरी; सळसळता, उत्साही, थोडा अविचारी, थोडा समजूतदार पण अतिशय लाघवी आणि लोभस! मार्च घराचा भिंतीइतका सहज भाग असलेली हना, कडक शिस्तीचे असले तरी संवेदनशील मिस्टर लॉरेन्स. अबोल, हळवा आणि मेगच्या प्रेमात असूनही मर्यादशील असा जॉन ब्रूक. पटकन येऊन झटकन महत्त्वाचे होणारे 'प्रोफेसर भाअर', डेझी आणि डेमी! आणि हो, माझ्यातल्या (तेव्हाच्या) 'टीनएजर'ला 'खडूस म्हातारी'ची प्रतिमा अचूक रेखून देणारी आणि पुढेपुढे (मला) थोडी थोडी कळू लागणारी 'आंट मार्च'! (खरं सांगायचं तर, तेव्हा 'आंट मार्च'ची 'खडूस' हीच प्रतिमा इतकी कोरली गेली मनावर की बाकी सगळ्यांचे मनावरचे ठसे बदलत गेले तरी आंट मात्र अजूनही 'खडूस'च राहिलीये कुठेतरी. म्हणजे तिने 'जो'ला तिची भली गडगंज 'प्लमफील्ड' इस्टेट दान करूनसुद्धा तिच्या नशिबात 'उदार' हे लेबल माझ्याकडून नाहीये; बिचारी!) 
एकोणिसाव्या शतकातील अमेरिकन आणि ब्रिटीश श्रीमंतांच्या संस्कृतीची चुणूक दर्शवणारी मॉफट, गार्डीनर, वॉगन मंडळींचा सुद्धा उल्लेख हवाच.

किशोरावस्थेकडून तरुण होत जाणाऱ्या मुलामुलींसोबत घडणारे हे प्रसंग, त्यांच्या महत्त्वाकांक्षा, युक्त्या-कल्पना, त्यांच्या चुका, जबाबदारीच्या जाणीवा आणि त्यानंतरच्या सुधारणा हे सगळे फारच ओळखीचे वाटतात. यातल्या माणसांतला जिव्हाळा गोड आहे, दाट आहे पण त्याचं अजीर्ण होत नाही. त्यांची भांडणं-गैरसमज हे अगदी 'आपल्याच' वाटणाऱ्या पद्धतीने कोणत्याही उपदेश किंवा तात्पर्याशिवाय सुटतात. या पुस्तकातल्या कोणत्याही घटनांबद्दल लिहिण्याऐवजी त्यांच्या परिणामांबद्दल लिहून मी बरोबर करतेय की चूक माहित नाही, पण माझ्या मते प्रसंगान्बद्दल लिहिलेलं वाचण्याऐवजी मूळ प्रसंग वाचणे केव्हाही अधिक उत्तम. शिवाय, या पुस्तकाचा मला इतका लळा आहे की त्यावर किती आणि काय लिहू असं होतंय माझ्यासाठी. म्हणजे मी एका प्रसंगाचा उल्लेख केला तर दुसऱ्यावर अन्याय झाल्याची बोच राहील मला. (आणि 'एवढं' लिहूनसुद्धा काही व्यक्तींचा उल्लेखचं राहिल्यासारखं मला वाटतंय!)

हे झालं पुस्तकाबद्दल, आता चित्रपटाबद्दल. अर्थातच इतक्या चित्तवेधक कादंबरीवर (आणि त्या कथेवर आधारित) अनेकदा चित्रपट बनले. त्यापैकी १९९४मध्ये चित्रपट प्रदर्शित झालेला चित्रपट मी पाहिला. 

गूगलवर मी जेव्हा शोधत होते तेव्हा या चित्रपटाबद्दल 'क्रिटिक रिव्ह्यू'मध्ये  म्हटलं होतं, "लिट्ल विमेन आणि गुड वाईव्ज या पुस्तकांवर तोपर्यंत बनू शकणारा हा सर्वात सुंदर चित्रपट आहे" आणि मी या मताशी पूर्णपणे सहमत आहे (वेल, मी इतर चित्रपट पाहिले नाहीयेत). किंबहुना मी म्हणेन पुस्तक वाचताना 'वाचकाचे कल्पनास्वातंत्र्य' या नावाखाली मी काही 'काहीच्या काही' कल्पना केल्या होत्या. (म्हणजे एकोणिसाव्या शतकातली माझी 'जो' बरेचदा जीन्स किंवा हाफ-स्कर्ट मध्ये असायची आणि लॉरी टी-शर्टमध्ये; आंट मार्च उगाचच पायाने अधू होती, मिस्टर मार्च माझ्यासाठी कायम धर्मगुरूच्या पायघोळ झग्यात असायचे तर मिस्टर लॉरेन्स नेहमी टाय आणि कोटात.) या माझ्या भ्रमांना चित्रपटाने छेद दिला तरी त्या विरूप होण्याऐवजी सुधारल्या.

चित्रपटातली सगळी मंडळी (त्यांना 'पात्र' म्हणणं मला जड जातंय.) म्हणजे अगदी माझ्या मनाशी एकरूप होत गेलेलीच - चार पोरी आणि त्यांच्या आजूबाजूची - माणसं आहेत. तत्कालीन पद्धतीन्प्रमाणे सरसकट लांब लांब ड्रेसेसमध्ये वावरणाऱ्या असल्या तरी मार्च मुली त्यांच्या वागण्यातून त्यांचे वेगवेगळे स्वभाव तितकेच स्पष्ट करतात. माध्यमाच्या बदलासोबत कथेतले काही प्रसंग (आणि काही दुवे) वगळावे किंवा बदलावे लागले आहेत. पण तरीही मार्च पोरी, मार्मी मार्च आणि त्यांच्यासोबत लॉरी, हना, मिस्टर लॉरेन्स, मिस्टर मार्च, आंट मार्च, मॉफट-गार्डीनर-वॉगन कुटुंबे, मिसेस कर्क आणि प्रोफेसर भाअर हे सगळे जसे वाचताना मनासमोर येतात तसेच वागतात. त्यांच्या दिसण्यातल्या (कल्पनेच्या भरात झालेल्या) चुका सुधारताना ते कुठेही परके होत नाहीत. (अर्थात, चित्रपट कितीही सुरेख असला तरी जातिवंत वाचक असल्याप्रमाणे माझं पहिलं प्रेम पुस्तकावरच!)

सुदैवाने मला खूपच उत्तमोत्तम पुस्तकं वाचायला मिळाली आहेत; पण चार पोरी माझ्यासाठी फक्त पुस्तकाची पात्र नाहीयेत. लुईसा अल्कॉटने मार्च बहिणी आणि लॉरीच्या व्यक्तिरेखा या ती, तिच्या बहिणी आणि त्यांचे शेजारी यांच्यावरून उचलल्या आहेत. पण मार्च मुलींशी माझं मैत्र गहिरं व्हायला त्यांचं मानवी उगमस्थान हेच कारण असावसं वाटत नाही. शांताबाईंची अनुवादशैली तर तोडीचीच (किंवा सरस सुद्धा म्हणता येईल.) पण तेही कारण अपुरंच. मुळात वाचताना वाचकाची पुस्तकासोबत एक वेगळी दुनियाच निर्माण होत असते (माझ्यामते, अपरिहार्यपणे!); तसं 'चौघीजणी'सोबतही माझं 'जग' आहे.

आणि खरंतर, या पुस्तकाशी माझे संबंध केवळ पुस्तक, कथा-कादंबरी अशा स्वरूपाचे उरलेले नाहीयेत. माझ्या किशोर-वयापासून गेली कितीतरी वर्षं हे पुस्तक माझी सोबत करतंय. ही फक्त 'वाचका'ची दुनिया नाहीये आता. कागद आणि काळापलीकडे जाऊन या सगळ्या माणसांशी मी भावनांनी बांधली गेलेय असं वाटतं मला. प्रत्येक माणसावर प्रत्येक पुस्तकाचा होणारा परिणाम वेगळा असतो हे मान्य केलं, तरीही, या पुस्तकाचा  तुमच्यावर होणारा परिणाम कसा आहे हे जाणून घेण्यासाठी तरी ते वाचायलाच हवं.

विस्तारलेला 'टिपकागद'

"ब्लॉग मूळ मराठीतच असणार आहे" असं मी सुरुवातीला म्हटलं खरं; पण 'डिसेप्शन पोईंट' वर मराठीत लिहिल्यानंतरही माझ्या असं लक्षात येतंय की इंग्लिश पुस्तकांवर इंग्लिशमध्ये लिहिणं जास्त सोयीस्कर आहे. 'टिपण काढणे' हा या ब्लॉगचा मूळ हेतू साध्य करताना ज्या त्या भाषेचा वापर अभिव्यक्तीसाठी आणि माझ्या व्यक्तिगत भाषाज्ञानाच्या समृद्धीसाठी अधिक प्रभावी ठरेल असं वाटतंय.

या व्यतिरिक्त, अलीकडे मला असंही जाणवलंय की, मी काही अतिशय सुंदर चित्रपट सुद्धा पाहिलेले आहेत ज्याबद्दल मला आवर्जून लिहून ठेवावसं वाटतं. शिवाय अनेकदा पुस्तकांवर बेतलेले चित्रपट पाहिलेले असतात. त्यात मग कधी पुस्तक वाचून त्यावर बेतलेला चित्रपट मुद्दाम शोधून पाहिलेला असतो, तर कधी चित्रपटाचं कथानक खूप भावल्याने मूळ पुस्तक शोधून वाचलं जातं. अर्थातच, पुस्तकाचं चित्रपटात रुपांतर करताना येणाऱ्या मर्यादांमुळे अनेक उत्तम पुस्तकांना न्याय मिळत नसल्याच्या भाबड्या समजुतीदाखल मी 'पुस्तकावर बेतलेला' प्रत्येक चित्रपट पाहिल्यानंतर मूळ पुस्तक वाचणं हे माझं कर्तव्य मानते आणि त्यादृष्टीने प्रयत्नसुद्धा करते. 'ओनलाईन', 'सोफ्टकॉपी', 'डाउनलोड्स', असल्या नावाखाली पुस्तकं 'हाताशी लागणं' माझ्यासाठी अत्यंत सोयीचं झालेलं असल्याने माझे हे कोड पुरवलेही जात आहेत.

म्हणूनच, 'टिपकागद' हा केवळ पुस्तकांची टिपणं काढण्याचा प्रयत्न न ठेवता, सर्व प्रकारच्या 'साहित्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न' करण्याचा विचार अनेक दिवसापासून मनात घोळत आहे. त्यावर काम तर चालू होतंच, आता यापुढे दृष्य कृती करतानाच, 'टिपकागद' वर पुस्तकांसोबत चित्रपटावर सुद्धा लिहिलेल्या पोस्ट पाहायला मिळू शकतात. शिवाय, पुस्तक आणि त्यावर बेतलेला चित्रपट याचं टिपण एकत्र घेणं, हे केव्हाही उत्तम. त्यात थोडी तुलनासुद्धा असेल आणि थोडी सोयसुद्धा!

तरी, माझ्यासारख्याच, वाचन मनापासून एन्जॉय करणाऱ्या मित्रांनो (म्हणजे मित्र आणि मैत्रिणींनो!) चला परत एकदा भिडूया पुस्तकांना, नव्या उत्साहाने आणि नव्या माध्यमासह!

Wednesday, 10 June 2015

युगंधर

"मृत्युंजय" बद्दल आधी लिहावं आणि नंतर "युगंधर" बद्दल, असं डोक्यात ठेवून मी गेले सहा महिने थांबले होते.. पण आता मात्र गप्प बसवत नाहीये अगदीच.

शिवाजी सावंत यांची एकूण ३ पुस्तकं मी वाचलीयेत. सगळी "Epic"! मृत्युंजय, छावा, आणि आता युगंधर. मृत्युंजय वाचलं तेव्हा फक्त 'एक प्रसिद्ध पुस्तक' आणि 'आवर्जून वाचलं पाहिजे असं पुस्तक' असं बोलबाला ऐकून वाचायला घेतलं. मग सावंतांच्या शैलीची छापच उमटली मनावर. (मृत्युंजय बद्दल वेगळं लिहायचंच आहे.) त्यानंतर संभाजीराजे यांच्यावरची धूळ झटकणारं (खरंतर त्यांच्यावरचे डाग स्वच्छ करणारं) पुस्तक अशी "छावा" ची कीर्ती वाचली आणि ते सुदैवाने घरात आलेलंच असल्याने पटकन वाचून सुद्धा झालं ("छावा" हा अर्थातच अजून एक स्वतंत्र विषय!). 'युगंधर'ची कीर्ती कानावर येत होती पण वाचनाचा योग जमून येत नव्हता. welll, आधीच अशी फार वर्षं वाट पाहिलेली असल्याने असेल पण 'युगंधर' हातात आल्यापासून साधारण १६ तासात ते सलग वाचून झालं (जेवणखाण ज्या त्या वेळेत हो!). 



युगंधर वाचण्याआधी यावर
एक नजर टाकायलाच हवी!
प्रस्तावनेपासून सुरुवात करायची असा माझा शिरस्ता. कुसुमाग्रज लाडके कवी होतेच (अजूनही आहेत किंबहुना) पण या 'युगंधर'मागे त्यांचं मोलाचं प्रोत्साहन आहे हे वाचून त्यांच्याबद्दलचा आदर कित्येक पट वाढला. शिवाजी सावंतांनी पुस्तक लिहिताना किती वेळ आणि किती वेळा break घेतला ते वाचून वाटायला लागलं की या मानाने माझा हे पुस्तक 'वाचायचा' योग नक्कीच लवकर आलाय. (LOL!) इतक्या चिकाटीने, इतकी वर्षं; अभ्यास, काम करणे आणि ते ही अशा प्रकारचं प्रतिभाजन्य काम... म्हणूनच अशा कलाकृती काळात अमर होऊन जातात बहुतेक! (वाक्य जरा जड झालंय, पण नाइलाज!)

'युगंधर' वाचताना मला अनेक ठिकाणी 'मृत्युंजय' चा sequel वाचत असल्यासारखं वाटत होतं. पण त्याला कदाचित पर्याय नसावा. काही ठिकाणी तर चक्क "वाचकाने आधी मृत्युंजय वाचलं असणार" असं सरळ गृहीत धरलेलं जाणवतं. पण मला वाटतं, हजार पानाचं पुस्तक वाचायला घेणारा वाचक किमान इतका अभ्यासू आणि रसिक असण्याची अपेक्षा हा उलट वाचकावर दाखवलेला विश्वास आणि त्याचा सन्मानच आहे.

मुळात मला 'युगंधर' 'भयंकर' आवडला त्याला कारण म्हणजे पहिल्यांदाच कुणा लेखकाने, श्रीकृष्णाकडे एक 'शाश्वत', 'मर्त्य' आणि 'मानव' म्हणून पाहत कथानकाची मांडणी केली आहे. त्याचे काही 'चमत्कार' कायम ठेवताना सुद्धा त्याच्यातला 'मनुष्यजन्म' जपला आहे. मला वाटतं, "दशावतार" मुळात अपेक्षित आहेत ते असेच.
त्यातल्यात्यात श्रीरामाच्या वागण्यात (आणि कथेत) आपल्याला बरेच मानवी संदर्भ सापडतात; पण बिचारा 'पूर्णपुरूष' श्रीकृष्ण मात्र आपण फारच परका, अमानवी करून टाकला आहे. भागवत पुराण असो व अजून कुठलं पुस्तक, श्रीकृष्णाचे चमत्कार गाण्यातच आपल्या लेखकांना धन्यता वाटत आली आहे. युगंधर मात्र या कसोटीवर पूर्ण वेगळा सिद्ध होतो. (अर्थात तसं प्रस्तावनेत स्पष्ट म्हटलेलंच आहे आणि त्या शब्दाला पुस्तक जागतं सुद्धा.)

श्रीकृष्णाचे आणि महाभारतातील इतर चमत्कार (द्रौपदी वस्त्रहरणासारखे प्रसंग, संजयच्या दिव्यदृष्टीचा प्रसंग, इ.) 'युगंधर' ला वर्ज्य नाहीत. पण श्रीकृष्णाचे गोकुळातील पराक्रम, त्याचे सर्वज्ञ असणे - त्याचे सजग आणि उत्कृष्ट गुप्तहेरखाते, त्याचे रुक्मिणीसोबतचे नाते, स्यमंतक घटनाक्रम, त्याचे प्रथम आठ विवाह, रुक्मिणीच्या आणि राण्यांच्या जबाबदाऱ्या, अर्जुनासोबत आणि कर्णासोबतचे संवाद, भगवद्गीता, युद्ध, युद्धानन्तरचा काळ, यादवांचा अंत या सगळ्यांमध्ये श्रीकृष्णाचे 'दिव्य' असण्यापेक्षा,  राज्यकर्ता आणि माणूस म्हणून वैचारिक दृष्ट्या प्रगत असणे प्रत्येक वेळी प्रतिबिंबित होते.

मथुरेचा, द्वारकेचा, भारतवर्षातील इतर प्रदेशांचा आणि राज्याभागांचा भौगोलिक संदर्भ अभ्यासपूर्ण असल्याचं जाणवतंच पण पुस्तकातले नकाशे सहज औत्सुक्याने पहिले जातात, त्यांचे संदर्भ लावले जातात; दुर्लक्षित केले जात नाहीत, हे महत्त्वाचं. प्रत्येक निवेदक आधीच्या घटनाक्रमाचा थोडक्यात पण आपल्या दृष्टीकोनातून आढावा घेतो आणि मगच पुढे सरकतो. पण या सगळ्या भानगडीत कधी कधी (थोडासा) कंटाळा येऊ शकतो (म्हणजे उगाच 'आपण सगळ्यांच्या बाजू ऐकून निकाल द्यायचा आहे' अशी भावना व्हायला लागते). पण त्यासुद्धा, काही निवेदक काय म्हणतात याबद्दल उत्सुकता वाटत राहते - दारुक, कर्ण किंवा द्रौपदी सारखे... दारुकाचे निवेदन कृष्णाचे सेवकवर्गाशी असलेले वागणे निर्देशित करतेच शिवाय त्याची अश्वतज्ञता आणि म्हणून कुशल सारथी अशी कीर्ती (जी सहसा इतर कोणत्याही महाभारताच्या पुस्तकात युद्धापूर्वी उल्लेखात येत नाही!) ती दर्शवते. कर्णाचे निवेदन मृत्युंजयच्या जवळ जाणारे असले तरीही वेगळे (निवेदकाचे कथेच्या मध्यवर्ती स्थानापासूनचे अंतर वेगळे असल्याने असावे बहुतेक). द्रौपदीचं निवेदन बऱ्याच अर्थांनी युगंधरमध्ये महत्त्वाचं आहे. आणि तिने केलेल्या पांडवांच्या स्वभावांवरील परीक्षणाशी मी तरी फारच सहमत होते. रुक्मिणीचं निवेदन हा मला वाटत 'युगंधर'ला 'मृत्युंजय'पासून वेगळं नेणाऱ्यापैकी एक महत्त्वाचा पैलू. तिचा श्रीकृष्णाकडे बघण्याचा दृष्टीकोन 'पतीपरमेश्वराय..' असला तरीही त्यांच्या नात्यातला बंध सुखावणारा. यादवांचा अंत किंचित अतिरंजित वाटतो, पण किंचितच आणि त्यातसुद्धा असलेली तर्कशुद्धता अपूर्व आहे.

भगवद्गीता तर इतक्या सुरेख आणि सोप्या पद्धतीने मांडली आहे की माझ्यासारख्या सर्वसामान्य (कथा-कादंबऱ्या वाचून धन्य होणाऱ्या) वाचकाला सुद्धा गीता-सार वाचल्याचा आनंद आणि ज्ञान मिळावं. कादंबरी म्हणून मांडताना सुद्धा गीतेचं महत्त्व कायम राखत ती टाळली तर नाहीच पण उगाच क्लिष्टदेखील केलेली नाही.

पण माझ्या मते, सर्वात सुंदर उत्तरे मिळतात ती दोन शंकांना. 
मला फार पूर्वीपासून (अगदी भौतिक) प्रश्न होता की श्रीकृष्ण द्रौपदीच्या स्वयंवराला कसा काय आमंत्रित होता? (i mean, स्वयंवराचे आमंत्रित हे त्यात भाग घेण्यासाठीच असतात असं आपलं माझं मत झालेलं... आणि "द्रौपदीसी बंधू शोभे.." हा विरोधाभास!) आणि दुसरं म्हणजे, आपल्या सगळ्यांचाच प्रश्न; सोळा हजार राण्या??????? (काहीही काय!) पण या दोन्हीला युगंधरने दिलेली उत्तरं चपखल आणि वादातीत आहेत. ते ही श्रीकृष्णाचा मानवजन्म आणि त्याचा मोठेपणा दोन्ही सांभाळून. (काही नाही तर यासाठी तरी - हजार पानाचं असलं तरी ही - युगंधर आवर्जून वाचावं!)

प्रसंगी, 'उंगली टेढी करणारा' श्रीकृष्ण मला (त्यासाठी) आधीच आवडत होता; आणि मुलगी म्हणून मला (पत्नीला परित्यक्ता जगायला लावणाऱ्या) श्रीरामापेक्षा, (सोळा हजार स्त्रिया सोडवणारा) श्रीकृष्ण सुद्धा आवडत होताच. पण त्याहीपेक्षा, या प्रश्नांची अशी काही उत्तरे देऊन जाणारा युगंधर अधिकच आदरणीय होतो. आणि फक्त तेवढी उत्तरेच नाही तर त्याचा 'स्त्रीपुरुषसमभाव' यापेक्षा कितीतरी खोलवर जाणारा, अधिक गंभीर आणि अधिक नित्यसहज आहे. श्रीकृष्णाच्या भक्तांनीच खरंतर त्याच्या 'सोळा हजार स्त्रिया' आणि पूर्ण'पुरूषत्व' यापलीकडे जाऊन त्याच्यातले हे समभावाचे 'पूर्ण'गुण समजून घेण्याची आत्यंतिक गरज सध्याच्या घडीला दिसते आहे. श्रीकृष्णाच्या मोरपिसापासून ते श्रीवत्स चिह्न आणि शंख, चक्रापर्यंत प्रत्येक गोष्टीचे अधिक तर्कशुद्ध समर्थन हे 'युगंधर'चं अतिमहत्त्वाच बलस्थान आहे.

"स्त्री", "पुरुष" या संकल्पना माणसांना लागू होतात (देवांना केवळ देव आणि देवी एवढा सम्बोधनातला दुजाभाव स्वीकृत आहे असं दिसतं) याचे दाखले आपल्या पौराणिक साहित्यात जागोजाग आढळतात. त्या पार्श्वभूमीवर श्रीकृष्णाच अतिमानुष (किंबहुना अमानुष) पूर्णपुरूषत्व मला फार काळ खटकत होतं. पण शिवाजी सावंतांचा श्रीकृष्ण "दैवी" पेक्षा "मानवी" स्वरुपात जास्त असतो. सगळ्या समस्यांना तो मानुष उत्तरं देतो. प्रत्येक वेळी सिद्ध करतो की तो 'पूर्णपुरूष' म्हणवला जातो कारण तो प्रगत असूनही 'मनुष्य' होता.

राधेचा सखा, द्रौपदीचा सखा बंधू आणि बलरामासाठी लहान, पती, मुलगा, एक निस्पृह कार्यकारी राज्यकर्ता, एक मार्गदर्शक, युद्धनीतीज्ञ, आणि एक विरागी सुद्धा.

प्रत्येक रुपात युगंधर लोभावतो तो एक माणूस म्हणून. 


Tuesday, 17 February 2015

Symbology पलीकडचे.......

Dan Brown च्या आत्तापर्यंतच्या सगळ्या पुस्तकांना पालथं घातलाय मी. सुप्रसिद्ध (किंवा वादग्रस्त) The Da Vinci Code पासून सुरुवात करून मग, Digital Fortress, Deception Point, Angels and Demons, The Lost Symbol, अगदी गेल्या दोन वर्षात आलेलं Inferno....... सगळे, (hard copy-soft copy) कसेही करून... The Da Vinci Code आणि Angels and Demons वर आलेले चित्रपट पाहून त्यावर माझी मतं सुद्धा देऊन झाली (नक्की पहावेत!).  आणि Angels and Demons तर इतकं सुरेख होता, की मी मनापासून वाट बघतेय त्याच टीमतर्फे Deception Point वर असा किंवा अजून चांगला चित्रपट येण्याची.

मध्यंतरी पुन्हा एकदा योग आला काही वर्षापूर्वी वाचलेलं "Deception Point" परत वाचायचा. अर्थात ते एका रात्रीत वाचून संपवला गेलं. Dan Brownची सगळी पुस्तकं वाचल्यानन्तर मी अशा निष्कर्षाप्रत आले होते, Deception Point मला सगळ्यात जास्त आवडलंय. त्याचं पारायण केल्यावर आता माझं हे मत अगदी पक्कं झालंय.

तशी ही सगळीच fictions आणि सगळीच श्वास रोखायला लावणारी. अत्यंत रसभरीत कथानक आणि ते तितक्याच प्रभावीपणे पुढे नेणारी. Robert Langdon Adventure नसलेल्या Dan Brownच्या दोन्ही पुस्तकांना (Digital Fortress आणि Dception Point) स्वतःचा एक ठसा आहे. त्यातही, Deception Point एका वेगळ्या जगात घेऊन जाणारं. चर्च आणि symbology (चिह्नशास्त्र) बाहेरचं, अर्धवट माहित असलेलं जग, त्यामुळे डोळ्यासमोर प्रसंग यायला अगदी सोपं, पण तरीही त्यातला अज्ञात धडकी भरवणार.

मुळात मला पृथ्वीच्या धृवीय क्षेत्राचं अपार आकर्षण, त्यात जेव्हा Deception Point सारखं पुस्तक हातात पडत, तेव्हा पर्वणीच. पुस्तकाच्या सुरुवातीला दिलेली note, की हे सगळं तंत्रज्ञान, या संस्था-संघटना, हे हुद्दे , अस्तित्वात आहेत; मला वाटत, अजून गंभीर करते आपल्याला.
(मला बायोलॉजी थोडंफार कळत असल्याने असेल कदाचित पण एकूणच) त्यातले सूक्ष्मजीवांचे, Bioluminiscence चे संदर्भ सुद्धा चटकन लक्षात येतात. डोळ्यापुढे जसेच्या तसे उभे राहू शकतात. (हा तर मला वाटतं, पुस्तक वाचनाचाच सगळ्यात आकर्षक भाग असतो)
नाही म्हणायला Goya दृष्यमान करायला जरा कठीण गेली मला. (Boat या प्रकाराच अज्ञान कारणीभूत असावं याला.)

कुठे एकही पात्र अनावश्यक येत नाही, किंवा जात नाही. अर्थात, Marjori Tench च जाण थोडं अनपेक्षित होतं मला.. म्हणजे "तिला का???" असं काहीसं.. पण प्रत्येक घटनेचा कथेत संदर्भ राहतो; आणि त्याहीपेक्षा मला महत्त्वाच वाटत म्हणजे कथा इतकी चित्तवेधक प्रकारे पुढे जात राहते की मागच्या घटनेचा संदर्भ जिथे असेल तिथे तो लक्षात यायला परत मागे जावं लागत नाही... (नाहीतर कधी कधी म्हणजे परत मग आधीचा प्रसंग वाचवा लागतो!) कथेचा ओघ सलग राहतो आणि आपण फक्त पुढेच सरकत राहतो.

सर्वाधिक अनपेक्षित आणि वेधक (नक्कीच अनुभवावी अशी गम्मत) म्हणजे नाव Deception Point असलं तरी प्रत्यक्ष Point of Deception सुद्धा कथेच्या ओघासह पुढे पुढे सरकत राहतो, बदलत राहतो......

Dan Brown म्हटलं की Robert Langdon ची साहसं सर्वात आधी डोळ्यापुढे येतात. Symbology हे या कथांचं बलस्थान. पण बलस्थान सोडून बांधलेली Dan Brown ची ही कथा मात्र अतिशय खिळवून ठेवणारी आणि म्हणूनच आवर्जून वाचावी अशी.