लहानपणी राम आणि कृष्ण यांच्या नंतरचे पहिले superhero अर्थातच "क्षत्रिय कुलावतंस गोब्राह्मणप्रतिपालक मराठी अस्मितेचा अभिमान" असलेले 'राजाधिराज छत्रपती' शिवाजी महाराजच! जाड-बारीक टायपातली त्यांची बरीच पुस्तकं वाचता यायला लागल्यापासून वाचून झाली होती. 'जाणता राजा' पाहताना ऐन राज्याभिषेकाच्या प्रसंगाला झोपही लागली होती! पण शिवरायांच्या (मला 'शिवाजी महाराज' पेक्षा 'शिवराय' अधिक भारदस्त आणि राजेशाही वाटतं.) चरित्रातली भव्यता आदर्श वाटण्यापेक्षा थोडा धाक, आब आणि अंतर राखणारी वाटली होती.
चौथीनंतरच्या सुट्टीत मी प्रीतमताईकडे काही दिवस राहायला असताना माझ्या हाती 'श्रीमान योगी' लागलं. मी वाचलेली ही बहुधा पहिलीच कादंबरी. अर्थातच 'रणजीत देसाई'सोबत पहिलीच भेट. त्यांची शैली मला तेव्हा फार आवडली याचं कारण बहुतेक हे होतं कि त्यामानाने लहान वयात वाचूनही मला त्या कादंबरीने खिळवून ठेवलं. त्यातला आशय कोणी समजावण्याची तशी गरज भासली नव्हती.
मी काही या पानावर 'श्रीमान योगी' चं समीक्षण लिहायला नाही लागलेय, पण कथा म्हणून, पुस्तक म्हणून, लिखाणाची शैली वगैरेतून मला जे काही भावलं, स्मरणात ठेवावंसं वाटलं, राहिलं, तेवढं टिपून ठेवण्याचा हा प्रयत्न आहे.
अर्थात शिवरायांवरची आणि इतरही काही पुस्तकं वाचल्यानंतर, मला 'श्रीमान योगी'चं अधिक-उणं ही दिसायला लागलं. "ज्यांनी ज्यांनी राजांचे ते बोल ऐकले त्या सर्वांच्या कातरलेल्या मनातून अश्रू झरत होते" अशासारखी काही वाक्यं मग खूप पुस्तकी वाटली (पुस्तकातली वाक्यं, 'पुस्तकी' वाटायला हरकत असू नये खरं म्हणजे!) पण अपेक्षित परिणाम कदाचित त्यांच्याचमुळे साधता आलाय.
आणि या सगळ्यानंतर, मी स्वतःशी जेव्हा गोळाबेरीज करते, तेव्हाही 'श्रीमान योगी' नक्कीच वाचा असं सांगावंसं नेहमीच वाटतं. वाचनाच्या क्षेत्रात नवखे असणाऱ्यांनाही या कादंबरीचं नाव नक्की माहित असतं. "इतिहास" असं दावा यावर रणजीत देसाई कधी करतच नाहीत; पण ऐतिहासिक व्यक्तीरेखेवरील कादंबरी म्हणून 'श्रीमान योगी' बऱ्याच वरच्या स्थानावर आहे. "शिवाजी महाराज" हा विषय हेच बहुतेक यामागचं बलस्थान आहे.